रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे वर्षा कुलकर्णी यांचा काव्य जीवनगौरव पुरस्कार
पुणे : मुक्तछंद म्हणजे स्वातंत्र्य आहे; स्वैराचार नाही. ज्या कविंना आपले विचार कोणत्याही छंदात, वृत्तात मावत नाहीत, छंदांचे बंधन वाटते त्यांनीच मुक्तछंदात काव्य लिहावे. कविता प्रकार अत्यंत सोपा आहे, असे आजच्या काळातील कवींना वाटते. त्यामुळेच कुणीही उठतो आणि कवी होतो. यातूनच कवींची बहुतेकवेळा अवहेलना, टिंगल, चेष्टा होते आणि कविता या साहित्यप्रकाराला तसेच कवीला गांभीर्याने घेतले जात नाही, अशी स्पष्टोक्ती महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केली.
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे काव्य जीवनगौरव पुरस्काराने ‘वृत्तबद्ध कविता : कला आणि शास्त्र’ या ग्रंथाच्या लेखिका आणि ज्येष्ठ कवयित्री वर्षा कुलकर्णी यांचा आज (दि. 23) सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोतल होते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष मैथिली आडकर मंचावर होते. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आजच्या कवींना ओवीबद्ध, छंदबद्ध लिखाणाचे तंत्र, शास्त्र अवलंबावे असे वाटत नाही, असे नमूद करून डॉ. सदानंद मोरे पुढे म्हणाले, अशा परिस्थितीत वृत्तबद्ध कविता : कला आणि शास्त्र या पुस्तकातून कविता या साहित्य प्रकाराविषयी मोलाची माहिती लोकांसमोर आणण्याचे कार्य वर्षा कुलकर्णी यांनी केले आहे. काव्य लिखाण करताना आजच्या कवींनी व्याकरणाला सुटी देणे, छंदबद्धता नाकारणे योग्य नाही.
सत्काराला उत्तर देताना वर्षा कुलकर्णी म्हणाल्या, काही वर्षांपूर्वीपर्यंत कविता लिखाणाचे शास्त्र असते याविषयी मलाही कल्पना नव्हती. परंतु हे जाणल्यानंतर साहित्य क्षेत्रातील दिग्गजांशी चर्चा, साहित्यप्रेमींचे अभिप्राय अनेक कवितांचे रसग्रहण, चर्चा यातून मी हे तंत्र समजावून घेत या विषयी सोप्या मराठी भाषेत छोटे छोटे लेख लिहिले. वडिलांनी पाठपुरावा केल्यामुळे या लेखांचे पुस्तकरूपात प्रकाशन झाले. त्या पुढे म्हणाल्या, काव्य लेखन करताना कवितेचा आशय, आत्मा, कला आणि शास्त्र यांचा संगम करत काव्याचे बीज पुरेसे रुजल्यानंतर बहरू द्यावे. आयुष्यभर विद्यार्थी राहून संपूर्णत्वाचा अट्टाहास न धरता कला व्रत म्हणून जोपासली जावी.
प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी पुरस्कार वितरण सोहळ्याविषयी माहिती सांगितली. परिचय आणि सन्मानपत्राचे वाचन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले तर सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केल.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित कविसंमेलनात प्रभा सोनवणे, स्वप्नील पोरे, तनुजा चव्हाण, वैजयंती आपटे, नचिकेत जोशी, मिलिंद छत्रे, डॉ. मृदुला कुलकर्णी-खैरनार, डॉ. मंदार खरे, डॉ. ज्योती रहाळकर, ज्योती उटगीकर-देशपांडे, सुजाता पवार यांचा समावेश होता. सूत्रसंचालन निरुपमा महाजन यांनी केले.