पुणे : प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशन आयोजित महिला कलाविष्कार मैफलीत रसिकांना शास्त्रीय, उपशास्त्रीय, भक्तीगीत, नाट्यगीत आणि तबला वादनाचा स्वराविष्कार अनुभवायला मिळाला.
महिला दिनानिमित्त प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनच्या संचालिका विदुषी सानिया पाटणकर यांनी या कार्यक्रमाचे एस. एम. जोशी सभागृहात आयोजन केले होते. उद्योजक चंद्रशेखर शेठ आणि विवेक सुरा यांची विशेष उपस्थिती होती.
मैफलीची सुरुवात आश्वासक युवा गायिका शाश्वती चव्हाण-झुरंगे यांनी राग मधुवंतीतील ‘मै आऊ तोरे मंदरवा’ या छोटा ख्यालने केली. यानंतर ‘रूप पाहता लोचनी’ हा अभंग सुरेलपणे सादर केला. त्यांना माधव लिमये (संवादिनी), ऋषिकेश जगताप (तबला), दीपक दसवडकर (पखवाज), श्रावणी गुरव (सहगायन) यांनी साथसंगत केली.
बनारस घराण्याच्या सुप्रसिद्ध तबलावादक हेतल मेहता (अहमदाबाद) यांची एकल तबलावादन मैफल रसिकांना विशेष भावली. त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात मध्यलय तीन तालातील विलंबित धमार सादर करून केली. त्यानंतर बनारास घराण्याचे वैशिष्ट्य असणाऱ्या चलनचारीची झलक दाखविली. बनारस घराण्यातीलच वैशिष्ट्य असणारे बाँठ, सवाई, अडकारी, झुला, अनागत तिहाई, दोहोरे बोलोंकी गत, ‘धा’चे वैविध्य दाखविणारा तुकडा, कथक नृत्य शैलीत वाजविला जाणारा तुकडा तयारीने सादर केला. विद्वान पंडित मदनमोहन (आझमगड) यांची उपज, पंडित किशनमहाराज यांचा फर्माइशी चक्रदार तसेच पंडित पूरणमहाराज रचित सवाई लय तबल्यावर ऐकवून मेहता यांनी रसिकांना आनंदित केले. मेहता यांना यशवंत थिट्टे यांनी लहेरासाथ केली.
मैफलीच्या अखेरच्या सत्रात ज्ञानेश्वरी घाडगे हिचे बहारदार गायन झाले. तिने ‘पद्मनाभा नारायणा’ या रचनेने सादरीकरणाची सुरुवात केली. सुरांवरील पकड, आवाजातील फिरत, दमदार ताना ऐकवून रसिकांना संमोहित केले. ‘केतकी गुलाब जुही चंपक’ ही रचना सादर केल्यानंतर ज्ञानेश्वरी हिने जग्तगुरू संत तुकाराम महाराज यांनी रचलेला आणि पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांनी आपल्या आवाजाने अजरामर केलेला ‘बोलावा विठ्ठल’ हा अभंग तसेच संत नामदेव महाराज रचित आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायनातून सर्वोच्चपदी नेऊन ठेवलेला ‘तीर्थ विठ्ठल’ हा अभंग एकत्रितपणे सादर करून गायनातील तयाराची झलक दर्शविली. ज्ञानेश्वरी हिच्या समर्पित गायनास रसिकांनी विठ्ठल नामाचा जयघोष करत सुरात सूर मिसळून टाळ्यांच्या गजरात साथ केली. ‘अलबेला सजन आयो रे’, ‘जयशंकरा करुणाकरा’, ‘कुहु कुहु बोले कोयलिया’ या रचना ऐकविल्यानंतर कार्यक्रमाची सांगता ‘सुरत पिया की छिन’ या नाट्यगीताने केली. तिला कार्तिकी घाडगे (संवादिनी), ऋषिकेश जगताप (तबला), दीपक दसवडकर (पखवाज), महेंद्र शेडगे (तालवाद्य) यांनी समर्पक साथ केली.
कलाकारांचा सत्कार विदुषी सानिया पाटणकर, उद्योजक चंद्रशेखर शेठ आणि विवेक सुरा यांनी केला. प्रास्ताविकात संस्थेचे विश्वस्त नितीन महाबळेश्वरकर यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली तसेच सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
‘महिला कलाविष्कार’बहारदार गायन-वादनाच्या मैफलीस रसिकांची मनमुराद दाद
Date: