पुणे-राज्यातील शाळांमध्ये यंदाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. ह्या सीबीएसई अभ्यासक्रमातील इतिहास विषयात महाराष्ट्राचा इतिहास समाविष्ट करण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिले आहे .
दीपक मानकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि , “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासाची वाटचाल करीत असताना महायुती सरकारने परिपूर्ण समाज घडविण्यासाठी राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम लागू करण्याचा व इंग्रजी शाळांमध्ये मराठी शिकवणेही बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व समस्त पुणेकरांकडून आपले मनपूर्वक आभार मानण्यात येत आहे.मंगल देशा,पवित्र देशा,महाराष्ट्र देशा असा आपला महाराष्ट्र ज्याने जगाच्या पाठीवर अनेक इतिहास रचले आहेत. ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमातून आपल्या महाराष्ट्राची यशोगाथा ही संपूर्ण देशासह जगात पसरली पाहिजे. राज्यातील शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्यापैकी एक म्हणजे राज्यातील शाळांमध्ये ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम लागू करणे. राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना ‘सीबीएसई’अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम लागू करण्यात येणार असून राज्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीवर राज्य सरकारने भर दिला आहे. ही कौतुकास्पद बाब आहे.
या ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमातील इतिहास विषयात महाराष्ट्राचा इतिहास शिकविला जाणे अत्यंत गरजेचे आहे. इतिहासात मराठा साम्राज्याबद्दल वाचले तर जर कोणाचे नाव प्रथम येते तर ते माँसाहेब जिजाई, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदवी स्वराजाचे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा भिडेवाडा येथे सुरु केली. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे, स्वा. विनायक दामोदर सावरकर यांसारख्या अनेक थोर पुरुषांचे कार्य तसेच ज्या क्रांतिकारकांच्या अथक प्रयत्नांतून व आत्मबलिदानातुन स्वातंत्र्याचा सुखकर दिवस भारतीयांच्या जीवनात उजाडला होता त्या क्रांतिकारकांचे कार्य हे ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमात शिकवले जाणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्र हे निसर्गसंपन्न राज्य असून त्यामध्ये असलेली ऐतिहासिक स्थळे, शिवकालीन मंदिरे, पर्यटनस्थळे यांची माहिती अभ्यासक्रमात घेण्यात यावी.
नुकत्याच नागपूर येथे झालेल्या आंदोलनात आपल्या हिंदू धर्माबाबत अनर्थ गोष्टी घडल्या. आपला इतिहास हा पुसून टाकण्याचा कोणाचा प्रयत्न असेल तर त्याला त्याची जागा दाखवून देणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या अभ्यासक्रमातच आपल्या महाराष्ट्रातील थोरपुरुष, क्रांतिकारक यांचा इतिहास शिकवला गेला तर भविष्यात आपले अस्तित्व दाखवून देण्याची गरज भासणार नाही.
महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राने दिलेलं योगदान लागू करण्यात येणाऱ्या सीबीएसई अभ्यासक्रमाद्वारे देशभरात कळले पाहिजे – दीपक मानकर
Date: