ब्बल ३५ फोटोग्राफर्सच्या १०० हून अधिक फोटोंचा समावेश ; प्रदर्शनाला विनामूल्य प्रवेश
पुणे : प्रवासात टिपलेले सुंदर क्षण मोबाईलमध्ये कैद करून त्याचा आस्वाद घेणे आणि इतरांसोबत शेअर करणे हा प्रत्येक भटक्याचा आनंदाचा भाग असतो. अशाच ३५ निवडक फोटोग्राफर्सच्या अप्रतिम फोटोंचा समावेश असलेल्या घुमंतु २५ – स्वान्तसुखाय छायाचित्रणाय च… या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दि. २५ ते २७ मार्च दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे होणार असून सकाळी ११ ते ८ यावेळेत रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहे, अशी माहिती डॉ. रामदास महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रदर्शनाचे उद्घाटन दि.२५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शनातील सहभागी फोटोग्राफर्सच्या हस्ते होणार आहे. प्रवास हा अनुभव समृद्ध करणारा असतो. कधी भव्य डोंगररांगा, कधी निळ्याशार समुद्राचे क्षितिज, तर कधी शहराच्या गजबजाटातले रंग प्रत्येक ठिकाण वेगळे दिसतात आणि त्याच्या अनमोल आठवणी. अशाच आठवणींना उजाळा देणारे आणि जगभरातील फोटोग्राफर्सच्या मोबाईलमध्ये टिपलेले अद्वितीय क्षण अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
डॉ. महाजन म्हणाले, या प्रदर्शनात ३५ निवडक फोटोग्राफर्सनी टिपलेले १०० आकर्षक फोटो प्रदर्शित केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, हे फोटोग्राफर्स विविध क्षेत्रात कार्यरत असलेले डॉक्टर, इंजिनिअर्स, गृहिणी, आयटी तज्ञ, विद्यार्थी आणि वैमानिक देखील आहेत. वयवर्षे २० ते ७७ या वयोगटातील या कलाकारांनी अमेरिका ते न्यूझिलंडपर्यंतच्या त्यांच्या प्रवासातील आठवणी मोबाईल मधून टिपल्या आहेत.
घुमंतु मालिकेतील हे तिसरे पुष्प आहे. याआधी सन २०२२ आणि २०२३ मध्येही अशीच प्रदर्शने आयोजित करण्यात आली होती आणि त्यांना पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर, नागपूर, बंगळुरू, कोचीन अशा अनेक शहरांमधून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. तरी पुणेकरांनी प्रदर्शनास आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.