खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, पोलिसात तक्रार पण कारवाई शून्य …
मुंबई-श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी उर्फ मनोहर भिडे यांच्या धारकऱ्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना धमकी देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. धमकी देणाऱ्यांनी थांब, उद्या तुझ्या घरी येतो असे म्हणत त्यांना दिवसातून एक-दोनदा नव्हे तर तब्बल 100 वेळा फोन केला आहे. कहर म्हणजे या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पण त्यावरही शून्य कारवाई करण्यात आली. खासदार सुप्रिया सुळे यांनी हा आरोप केला आहे.राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पोलीस आयुक्त यांनी कृपया याची गांभीर्याने नोंद घ्यावी. सामाजिक कार्यकर्त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आणून अशा पद्धतीने झुंडशाहीने दहशत माजवू पाहणाऱ्या व बेकायदा कृत्य करणाऱ्या लोकांचा तात्काळ बंदोबस्त होणे आवश्यक आहे. सोबत विकास लवांडे यांचा 3 मार्च 2025 रोजीचा लोणीकंद पोलिसांनी घेतलेला जबाब; पण दोषींवर अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
सुप्रिया सुळे या प्रकाराची माहिती देताना म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना संभाजी भिडे गुरुजींचे धारकरी म्हणवनाऱ्यांकडून शेकडोच्या संख्येने फोनवरून व सोशल माध्यमातून जाहीरपणे जीवे मारण्याच्या व घात अपघात करू अशा अनेक धमक्या आलेल्या आहेत. याबाबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि पुणे शहर पोलिसांना सविस्तर पुराव्यासह तक्रार देऊनही अद्याप पर्यंत कुणावरही काहीही कारवाई केलेली नाही.
1 मार्च 2025 रोजी सायंकाळी विकास लवांडे यांच्या हवेली तालुक्यातील शिंदेवाडी गावात 250 ते 300 बाहेरील तरुणांचा बेकायदा जमाव त्यांच्या घरावर दहशत माजवण्याच्या हेतूने गेलेला होता. त्यावेळी स्थानिक पोलिसांना कळवले व गावात पोलिस बंदोबस्त मिळाला म्हणून पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र तक्रार देऊनही पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही. त्यानंतरही धमक्या सुरूच आहेत. कालही ७६६६२३७९०९ या मोबाईल नंबरहून अज्ञात व्यक्तीने ” जय श्रीराम ” म्हणत उद्या तुझ्या घरी येतो आणि दाखवतो अशी धमकी विकास लवांडे यांना दिली आहे.