पुणे-छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला मदत करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांचा बुरखा फाडा, अशी मागणी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केली आहे. त्यांनी पोलिसाकंडे कोरटकरचा पासपोर्ट जप्त करण्याचीही मागणी केली आहे.प्रशांत कोरटकरवर इंद्रजित सावंत यांना धमकी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढल्याचा आरोप आहे. त्यातच तो दुबईला पळून गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर इंद्रजित सावंत यांनी त्याचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, पोलिसांनी प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा. कोणतीतरी यंत्रणा आहे, जी कोरटकरसारख्या माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या मनात अशी शंका आहे. यामुळेच त्याला आतापर्यंत अटक होत नाही.
शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या काही प्रवृत्ती असतील तर त्या शोधून काढल्या पाहिजेत. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. त्यांचा बुरखा फाडून टाकला पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे. हे शासनाचे विशेषतः गृहमंत्र्यांचे काम आहे. इंद्रजित सावंत यांनी यावेळी कोरटकरला आपला मोबाईल नंबर कुठून मिळाला? असा सवालही उपस्थित केला.ते म्हणाले, मी कोल्हापुरात राहतो. माझा व त्या कोरटकरचा आयुष्यात केव्हाच संबंध आला नाही. मग माझा दूरध्वनी क्रमांक, माझा मोबाईल क्रमांक त्याला कुणी दिला? या गोष्टीचाही सोक्षमोक्ष लागला पाहिजे. त्याच्या मोबाईलमधून जे कम्युनिकेशन झाले ते समोर आले पाहिजे. धमकी देऊन एक महिना लोटला तरी तपास पुढे सरकला नाही. त्यामु्ळे माझा भ्रमनिरास होत आहे.पोलिसांशी माझे थेट बोलणे झाले नाही. माझे वकील त्यांना भेटून आलेत. आम्ही पोलिसांकडे कोरटकरचा पासपोर्ट ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. शिवरायांच्या अवमानामुळे शिवप्रेमींची मने व्यथित झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः नागपूरचे आहेत. त्यामु्ळे हे सर्व प्रकरण चिल्लर निश्चितच नाही. हा अतिशय गांभिर्याने घेण्याचा मुद्दा आहे. कारण, हा मुद्दा केवळ मला धमकी मिळाली किंवा शिवीगाळ झाल्याचा नाही. तर मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या शिवाजी महाराजांविषयी काय भावना आहेत? त्याचा आहे. त्यामुळे एक संवेदनशील मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून त्यांनी हा मुद्दा हाताळावा.इंद्रजित सावंत यांनी जुना राजवाडा पोलिस स्टेशनच्या तपास अधिकाऱ्याकडे एका अर्जाद्वारे प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी केली आहे. आजपर्यंत प्रशांत कोरटकर इंदूर, चंद्रपूर व कोलकाता आदी ठिकाणी लपल्याच्या बातम्या येत होत्या. पण आता तो थेट दुबईला पळून गेल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांना फरार आरोपीची चौकशी करण्यासाठी सगळ्या कायदेशीर मार्गांचा वापर करण्याचा अधिकार आहे. माझी विनंती आहे की, आरोपी प्रशांत कोरटकर याचा पासपोर्ट पोलिस स्टेशनला आणून दाखवणे व पासपोर्ट जमा करण्याविषयी त्याच्या पत्नीला समन्स बजावण्यात यावा. तसेच त्याला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांची चौकशी केली जावी, असे सावंत यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.