पुणे : सायबर गुन्ह्यांचे प्रमाण समाजात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) सतत कार्यरत असणारी तरुण पिढी सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य ठरते आहे. तरुण पिढी गुन्ह्यांमध्ये कशी ओढली जाते हे त्यांनाही समजत नाही. मोबाईलचा वापर किती आणि कसा करावा याविषयी पालक मुलांना सजग करत नसल्यानेही मुलांच्या हातून चुका घडत आहेत. समाजातील ही परिस्थिती पाहता रोटरी क्लबने सायबर सुरक्षेबाबत जागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी, रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. दीपक शिकारपूर यांनी केले.
रोटरी क्लब ऑफ पुणे विस्डमतर्फे व्यावसायिक सेवा आणि गुणवत्ता पुरस्कारांचे वितरण डॉ. शिकारपूर आणि जिल्हा व्यावसायिक संचालिका मधुमिता बर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी डॉ. शिकारपूर बोलत होते. कोथरूड येथील गांधी भवनात आयोजित कार्यक्रमात आयजीपी, महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमीचे संचालक डॉ. राजेंद्र डहाळे यांचा व्यावसायिक गुणवत्ता पुरस्काराने तर हेल्दी फूड बँकेची स्थापना करणाऱ्या डॉ. प्रतिभा कोलते यांचा व्यावसायिक सेवा पुरस्काराने गौरव करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ पुणे विस्डमचे अध्यक्ष निलेश धोपाडे, सचिव पूजा वाडेकर मंचावर होते.
समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा रोटरी क्लब ऑफ पुणे विस्डमतर्फे गौरव करण्यात येत आहे, याबद्दल मधुमिता बर्वे यांनी क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
सायबर गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी डॉ. दीपक शिकारपूर यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरल्याचे सांगून डॉ. राजेंद्र डहाळे म्हणाले, बँकेसंदर्भातील माहिती अनेकजण मोबाईलमध्ये ठेवतात. अनावश्यक फोन कॉल्सला प्रतिसाद दिल्यामुळे गोपनिय माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती लागते, त्यामुळे मोबाईल वापरताना सजग राहून योग्य तऱ्हेने हाताळावा. सेवानिवृत्तीनंतर समाजकार्यात स्वत:ला वाहून घ्यायचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी आहार, विहार आणि व्यवहारात सुधारणा झाली पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. प्रतिभा कोलते यांनी व्यक्त केली.
सायबर सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी रोटरीने पुढाकार घ्यावा-डॉ. दीपक शिकारपूर यांचे आवाहन : व्यावसायिक गुणवत्ता, सेवा पुरस्कारांचे वितरण
Date: