- भरती विभाग पुणे आणि पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने आयोजन
- सैन्यात भरती होण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देणार ”
पुणे ; प्रतिनिधी
राष्ट्र उभारणीत भारतीय सैन्याच्या भूमिकेबद्दल जागरूकता पसरवणे आणि सैन्य दलातील करिअरच्या विविध संधींवर प्रकाश टाकून सैन्यात भरती होण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी भारतीय सैन्य दलाच्यावतीने पुण्यात युगांतर २०४७ चे आयोजन करण्यात आले आहे. सैन्य दलाच्या पुणे भरती विभागाच्या वतीने आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे दि. २५ रोजी हा कार्यक्रम होणार आहे. पुण्यातील प्रसिद्ध संस्थांमधील सुमारे ३ हजार महाविद्यालयीन विद्यार्थी त्यात सहभागी होणार असून हा कार्यक्रम “युवा, योग आणि तंत्रज्ञान” या थीमवर केंद्रित असणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचे प्रेरक व्याख्याने, भारतीय सैन्यात सामील होण्याबाबत माहिती सत्रे, कॅडेट्सनी त्यांच्या परिवर्तनाच्या प्रवासातील अनुभवांची देवाण- घेवाण, प्रसिद्ध वक्त्या सुश्री जया किशोरी यांचे विशेष प्रेरक व्याख्यान, आधुनिक लष्करी तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणारे शस्त्र प्रदर्शन, प्रशंसित मानस तज्ज्ञ अमित कलंत्री यांचे मन वाचण्याचे सादरीकरण आणि सबली – द बँड यांचे थेट संगीत सादरीकरण यांचा समावेश असून आरजे तरुण हे कार्यक्रमाचे सूत्र संचालन करणार आहे.
या कार्यक्रमात ‘राष्ट्र उभारणीकडे’ या प्रेरणादायी चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचा उद्देश राष्ट्र उभारणीत भारतीय सैन्याच्या भूमिकेबद्दल जागरूकता पसरवणे आणि दलातील विविध करिअर संधींवर प्रकाश टाकणे आहे. भारताच्या विकसित राष्ट्रात रूपांतरामागील प्रेरक शक्ती म्हणून तरुणांची भूमिका असल्याने, हा कार्यक्रम त्यांना ते अर्थपूर्ण योगदान कसे देऊ शकतात यासंबधीचा विचार देणार आहे.
‘युगांतर २०४७’ हा केवळ एक कार्यक्रम नाही तर तरुणांना भारतीय सैन्याच्या नीतिमत्तेशी जोडण्यासाठी, त्याची मूल्ये समजून घेण्यासाठी आणि राष्ट्रसेवेच्या संधी शोधण्यासाठी एक व्यासपीठ आहे. भारताचे भविष्य घडवण्यासाठी शिस्त, नेतृत्व आणि नवोपक्रमाचे महत्त्व हा उपक्रम अधोरेखित करतो.
– पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप.
भारतीय सैन्य दल आणि पुनीत बालन ग्रुप यांच्यावतीने पुण्यातील तरुणांसाठी युगांतर २०४७ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या तरुण पिढीला भारताच्या गौरवशाली इतिहासहाची माहिती करून देण्यासाठी एक महत्वाचा प्रयत्न आहे. या एकदिवशीय कार्यक्रमात पुण्यातील विविध शैक्षणिक संस्था मधील ३ हजार विद्यार्थ्यांना भारतीय सेनेची ताकद आणि सैन्य दलाच्या वतीने आत्मनिर्भर भारतासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नाची माहिती दिली जाणार आहे. या कार्यक्रमात एनडीएचे विद्यार्थी त्यांचे अनुभव कथन करणार असून भारतीय संस्कृतीची झलक दाखविण्यासाठी प्रसिद्ध वक्त्या जया किशोरी यांचेही व्याख्यान होणार आहे. युवा, योग आणि तंत्रज्ञान” असा धागा असलेल्या या कार्यक्रमात आपले स्वागत असून येत्या २५ मार्च रोजी गणेश कला क्रीडा येथे सकाळी साडे दहा वाजता आम्ही आपल्या स्वागतासाठी सज्ज आहोत.
– मेजर जनरल योगेश चौधरी. (व्हिएसएम, एडीजी, झेड आर ओ)