राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धेचे उद्धाटन
पुणे, दि.२१ मार्च: “आधुनिक काळातही लाल मातीवर प्रेम करणारे डॉ. विश्वनाथ कराड हे खर्या अर्थाने कुस्ती जगविण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहेत. असे विचार हिंदकेसरी दीनानाथ सिंग यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, पुरातन यज्ञभूमी रामेश्वर (रुई) ग्रामस्थ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड स्मृती प्रित्यर्थ संत एकनाथ महाराज षष्ठीचे औचित्य साधून लातूर येथील रामेश्वर (रुई) येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा २०२५ च्या उद्घाटन प्रसंगी सन्माननीय पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी आमदार रमेश अप्पा कराड हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच, महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम, शिवछत्रपती पुरस्कार विष्णुतात्या जोशीलकर, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, पैलवान बंडा पाटील रेटरेकर, नजरूद्दीन नाइकवडी, शिवछत्रपती पुरस्कार दिनेश गुंड, रामेश्वरचे माजी सरपंच तुळशीराम दा. कराड, श्री. काशीराम दा. कराड, डॉ. हनुमंत कराड, श्री. राजेश कराड , ऋषिकेश कराड व प्रा. विलास कथुरे उपस्थित होते.
दिनानाथ सिंग म्हणाले, ” डॉ. कराड हे पुनम का चाँद आहेत. त्यांनी पैलवानांना जो आधार दिला आहे त्यातून खेळाप्रती प्रेम दिसून येते. ही स्पर्धा सतत अशीच चालत राहावी यासाठी पुढील पिढी तयार आहे.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”मऊ मेणाहूनि आम्ही विष्णूदास | कठीण वज्रास भेदू ऐसे ॥’ अशी परंपरा असलेल्या रामेश्वर (रुई) या छोट्याशा गावात जागतिक स्तरावरील पैलवान येत आहे ही अभिमानास्पद बाब आहे. आमच्यावर विश्वास ठेऊन येथे येणार्या पैलवानांसाठी आम्ही काबिल ठरण्याचा प्रयत्न करीत आहोत. हा खेळ परंपरेचा असून लोकांना जोडणारा असून भावी जीवनाला दिशा देणारा आहे. ही स्पर्धा १८ वर्षापासून सुरू आहे. तसेच येथे सर्वधर्मांचे मंदिर असल्याने हे गांव संपूर्ण जगभर मानवता तीर्थ म्हणून ओळखले जात आहे. मराठवाडा हा साधु संतांची भूमिका आहे. या पुढील काळात भारत देश संपूर्ण जगासमोर विश्वगुरू म्हणून उदयास येणार आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरेचा संदेश स्वामी विवेकानंद यांनी जगासमोर ठेवला आहे. ते आता सत्यात उतरतांना दिसत आहे.”
विष्णुतात्या जोशीलकर म्हणाले, ” वारकरी हे धारकरी अशा उक्ती प्रमाणे डॉ. विश्वनाथ कराड यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ घेतली जाणारी ही स्पर्धा अद्वितीय आहे. संपूर्ण राज्यात अशा प्रकाराचा कार्यक्रम होत नाही. हे गांव सर्वधर्म समावेशक असून संपूर्ण लोकांना घेऊन वाटचाल करीत आहे.”
प्रा.विलास कथुरे यांनी प्रास्ताविकेत कुस्ती संदर्भातील संपूर्ण माहिती दिली. तसेच या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातून पैलवान आले आहेत. यात एकूण २०० पैलवान लात मातीत उतरणार आहेत.
उदघाटनाची कुस्ती कोल्हापुरचा अभिषेक जोगदंड व रामेश्वर रूई येथील जुणेद पठाण यांच्यात झाली. या मध्ये जुणेद पठाण हा विजयी झाला.
तसेच पुणे येथील भालचंद्र कुंभार व पुण्याचाच सोनु कोलाटकर यामधील स्पर्धेत भालचंद्र कुंभार हा चितपटाने विजयी झाला.
कुस्ती स्पर्धेचे धावते वर्णन समालोचक बाबा निम्हण यांनी केले.
डॉ. महेश थोरवे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विलास कथुरे यांनी आभार मानले.