जळगाव -जिल्ह्यातील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांच्या हत्येची घटना आज सकाळी समोर आली. या प्रकरणामुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. युवराज कोळी हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे कार्यकर्ते होते. तसेच ते कानसवाडा या गावचे माजी उपसरपंच देखील होते. त्यांच्या या हत्येमुळे आता जळगाव जिल्हा चांगलाच हादरला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजे असताच आजा जळगाव जिल्ह्यातील आणखी एक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील कानसवाडा गावात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी उपसरपंच युवराज सोपान कोळी यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर चॉपर आणि चाकूने हल्ला केला होता. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमागचे कारण अद्याप अस्पष्ट झालेले नाही. जळगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गावातीलच रहिवासी असलेल्या तीन आरोपींनी सकाळी आठ वाजता युवराज कोळी यांच्यावर हल्ला केला. यामध्ये चाकू आणि चॉपर यांच्या माध्यमातून कोळी यांच्यावर सपा-सपा वार करण्यात आले. हे वार वर्मी लागल्याने युवराज कोळी जागीच कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेनंतर गावातील नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. युवराज कोळी यांच्या नातेवाइकांनी आक्रोश व्यक्त करत या प्रकरणातील दोषी व्यक्तींना लवकरात लवकर ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. मात्र युवराज कोळी यांचा नेमका खून कोणत्या कारणामुळे झाला? हे अद्याप समोर आलेले नाही. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून त्यांनी संतप्त नागरिकांना शांत केले आहे. तसेच अधिक तपास सुरू आहे.