पुणे-डोंबिवली येथून कर्नाटकातील विजापूर येथे विक्रीसाठी ३४ लाख ६३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन जात असलेल्या व्यापाऱ्याचे दागिने मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास चोरीस गेल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात बेहराराम कपुराराम कुमावत (वय- ४४,रा. डोंबिवली) यांनी अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बेहराराम कुमावत हे मुळ राजस्थान मधील जालोर जिल्ह्यातील रहिवासी असून कामानिमित्त डोंबिवली येथे वास्तव्यास आहे. नऊ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता त्यांनी वे. व्ही.आर. ट्रॅव्हल्सची बस (एमएच १२ वीएफ ८२४३) ही कर्नाटकला जाण्याकरिता पकडली होती. सीट क्रमांक ३१ वर ते बसलेले असताना १० मार्च रोजी मध्यरात्री साडेतीन वाजताच्या सुमारास हडपसर येथील टोलनाक्याजवळ एका छोट्या मंदिराजवळ बस प्रवाशांना वॉशरुमला जाण्यासाठी थांबली होती. त्यावेळी सदर व्यापाऱ्याचे बाजूला सीट क्रमांक ३२ व ३३ वर बसलेले दोन संशयित प्रवासी सुद्धा गाडीच्या खाली उतरले होते.व्यापारी गाडीतून खाली उतरुन थोड्या वेळाने पुन्हा गाडीत आल्यावर त्यांचे दोन बँगा कोणीतरी लंपास केल्याचे दिसून आले. सदर व्यापारी हा मागील दीड वर्षापासून सोने खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असून त्याने वेगवेगळया ज्वेर्लसकडून सुमारे ३४ लाख ६३ हजार रुपयांचे ४५७ ग्रॅम सोने खरेदी केलेले संबंधित बँगेत होते.सोने चोरीस गेल्याने व्यापाऱ्याने बस चालकास त्याची माहिती दिली. त्यानुसार प्रवाशांची तपासणी केली असता व्यापाऱ्याचे बँग सापडल्या नाहीत. दरम्यान, गाडीत एक आकाश नावाचा संशयित प्रवासी होता ताे दिसला नाही. मग त्याचा मोबाईल नंबर बंद आला. हडपसर पोलिसांकडे याबाबत उशिराने तक्रार दाखल झाल्यानंतर, त्यांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरु केली आहे. नियोजनबध्द सदर गुन्हा केल्याचा पोलिसांना संशय असून त्याबाबत अधिक तपास हडपसर पोलिस करत आहे.