मुंबई-मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अटकेचे आदेश दिले होते, अशी खळबळजनक बाब मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या सुनावणीत समोर आली आहे. औरंगजेबाची कबर व दिशा सालियन आत्महत्येवरून अवघ्या महाराष्ट्राचे वातावरण तापले आहे. त्यातच ही नवी बाब समोर आली आहे.
यासंबंधीच्या मीडिया रिपोर्टनुसार, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची विशेष NIA न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू आहे. या प्रकरणातील याचिकेच्या सुनावणीवेळी संशयित सुधारक द्विवेदी यांच्या वतीने वकील रणजित सांगळे यांनी युक्तिवाद करताना उपरोक्त दावा केला आहे. ते म्हणाले, परमबीर सिंग यांनी एटीएसचे तत्कालीन अधिकारी महबूब मुजावर यांना बोलावले होते. त्यानंतर त्यांनी त्यांना नागपूरला जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांना उचलण्याचे व मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते.पण हे आदेश तोंडी असल्याने त्यांनी त्याचे पालन केले नाही. परिणामी, मुजावर यांना सोलापुरातील एका खोट्या प्रकरणात गोवण्यात आले. मुजावर यांनी सोलापूर कोर्टात दिलेल्या जबाबात ही माहिती उजेडात आली आहे. मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास खोटा व हिंदू दहशतवादाचे खोटे कथानक पसरवण्यासाठीच होता, असा दावाही वकील सांगळे यांनी यावेळी आपल्या युक्तिवादात केला.माजी एटीएस अधिकारी मुजावर यांनी आधीच मीडियाला माहिती देताना सांगितले की, संदीप डांगे व रामचंद्र कलसांग्रा एटीएसच्या कोठडीत मृत्यू पावले होते. परंतु विशेष एनआयए न्यायालयात दाखल केलेल्या एटीएसच्या आरोपपत्रात त्या दोघांना जिवंत दाखवण्यात आले. आता एटीएसला ते हवे आहेत, असे वकील सांगळे यावेळी म्हणाल्याची माहिती आहे. या खुलाशामुळे परमबीर सिंग यांचे मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासाशी असणारा संबंध उजेडात आला आहे.
दरम्यान, मालेगाव येथील एका मशिदीजवळ 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. हा बॉम्ब एका दुचाकीवर पेरण्यात आला होता. त्यात 6 जण ठार, तर 100 हून अधिक जण जखमी झाले होते. आता या प्रकरणात नवनवीन खुलासे होत असून, राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.