सातारा – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक केली आहे. 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी घेतले ताब्यात. सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटींची मागणी करत 1 कोटी स्वीकारत असताना कारवाई करण्यात आली.
दरम्यान रोहित पवार म्हणाले की, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप केलेल्या महिलेने करार केला होता की त्या महिलेला कुणी त्रास देणार नाही, त्या करारामुळे ते कोर्टातून सुटले. पण तो करार करण्याची गरज काय असा सवाल पवारांनी उपस्थित केला आहे.
सातारा जिह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे जयकुमार गोरे हे आमदार आहेत. 2016 मध्ये आमदार असताना जयकुमार गोरे यांनी महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक महिने स्वतःचे नग्न फोटो महिलेला व्हॉट्सॲपवर पाठवले होते. या त्रासाला कंटाळून महिलेने सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर जयकुमार गोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर अटक टाळण्यासाठी गोरेंनी प्रथम सातारा जिल्हा न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. पण न्यायालयाने त्यांचा अटकूपर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर गोरे यांना अटक होऊन 10 दिवसांची जेलवारीही झाली होती.
या घटनाक्रमानंतर जयकुमार गोरे यांनी 2016 मध्ये सातारा जिल्हा न्यायालयात पीडित महिलेची लेखी माफी मागितली. तसेच पुन्हा त्रास देणार नाही, अशी वकिलांमार्फत हमीही दिली. पण आता महायुती सरकारमध्ये जयकुमार गोरे यांना ग्रामविकास मंत्रिपदाचे ‘बक्षीस’ देण्यात आले आणि त्यांनी महिलेला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. जानेवारी 2025 पासून अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर पीडितेने 2016 मध्ये दाखल केलेली तक्रार व्हायरल करण्यात आली. त्यामुळे पीडितेचे नाव उघड झाले. तिची बदनामी केली गेली. 9 जानेवारी 2025 रोजी पीडित महिलेच्या घरी पत्र आले. त्यात 2016ची तक्रार होती. हे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी सुरू आहे, असे पीडित महिलेने म्हटले.
जयकुमार गोरे यांनी आपले पीए अभिजित काळे यांच्यामार्फत माझ्याविरोधात दडिवाडी पोलिस ठाण्यात 2 कोटी खंडणीची तक्रार दाखल करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला अशी माहिती त्या महिलेने दिली होती.