पुणे -बारामती येथे निर्मिती विहार इमारत, बी विंग- १ या गृहप्रकल्पाचा प्रस्ताव नगरपरिषद बारामती येथे दाखल करण्यात आला हाेता. सदरचा प्रस्ताव मंजुर करण्याकरिता बारामती नगरपरिषदेतील नगर रचनाकार विकास किसनराव ढेकळे (वय- ५०) यांनी दाेन लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजाेडीअंती पावणेदाेन लाख रुपये लाचेची रक्कम ठरवून पहिला हफ्ता एक लाख रुपये स्विकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने (एसीबी) सापळा रचून अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी आराेपी विराेधात बारामती शहर पाेलीस स्टेशन येथे ४५ वर्षीय तक्रारदार यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार विकास ढेकळे या वर्ग एकचे अधिकाऱ्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार हे बांधकाम व्यवसायिक असून त्यांची एक फर्म आहे. त्यांनी एका गृह प्रकल्पाचा प्रस्ताव नगरपरिषद बारामती येथे दाखल केला हाेता. त्यासाठी नगररचनाकार यांनी तक्रारदार यांचेकडे दाेन लाख रुपयांचे लाचेची मागणी करण्यात आली. याबाबत तक्रारदार यांनी एसबीकडे तक्रार दिली. त्यानुसार एसीबीचे पथकाने पडताळणी केली असता अाराेपीने पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे संबंधित कामासाठी दाेन लाख रुपये लाच मागणी केली. त्यापैकी तडजाेडीअंती पावणेदाेन लाख रुपये लाच देण्याचे ठरले. त्याचा पहिला हफ्ता एक लाख रुपये ऑक्सीजन जिम, बारामती येथे घेताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले आहे.सदरची कारवाई पाेलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पाेलीस अधीक्षक डाॅ.शीतल जानवे, सहपाेलीस आयुक्त दयानंद गावडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याबाबत पुढील तपास पाेलीस निरीक्षक अमाेल भाेसले करत आहे.