सांस्कृतिक कार्यमंत्री एँड आशिष शेलार यांची संकल्पना
कालिदास नाट्यमंदिरात रसिकांना मोफत प्रवेश
मुंबई, दि. २० : चित्रपट संगीत रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळविणारे प्रसिद्ध संगीतकार दिवंगत ओ. पी. नय्यर यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने मुलुंड येथील महाकवी कालिदास नाट्यमंदिरात उद्या शुक्रवारी (ता. २१) रात्री ८ वाजता `पुकारता चला हूं मैं’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून ओपींनी संगीतबद्ध केलेली अजरामर गीते पुन:र्रचना करून अनोख्या पद्धतीने सादर केली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी रसिकांना मोफत प्रवेश असून, ओ. पी. नय्यर यांच्या गीतांमध्ये रमण्याचा अनुभव घेता येईल.
राज्य सरकारचा सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने संगीतकार ओ. पी. नय्यर यांना आदरांजली म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मोहित शास्त्री यांचे संगीत संयोजन आहे. त्यांनी ओपींच्या संगीताची पुनःर्रचना केली आहे. सर्वेश मिश्रा, संपदा गोस्वामी, अभिलाषा चेल्लम आणि श्रद्धा वैद्य हे गायक ओ पी नय्यर यांच्या गाण्यांना एक नवा रंग देणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांच्याकडून बहारदार व हलकेफुलके निवेदन केले जाईल. तर दिग्गज वादक दीपक कुमठेकर, सागर साठे, यश लालका, नागेश कोळी, अभिजीत सावंत, निशा मोकल, स्वप्नील दिवेकर, पंकज धोपावकर आणि मोहित शास्त्री हे सर्व संगीत रसिकांचे मनोरंजन करणार आहेत.
कार्यक्रमाची निर्मिती संजीवनी भिडे, अधिता लेले आणि गीता बांदेकर यांच्यातर्फे करण्यात आली आहे. या संकल्पनास ‘अद्विरा किएटिव्स’ यांनी आकार दिला आहे.
या कार्यक्रमाला रसिकांनी आवर्जून उपस्थित राहून ओपींना जन्मशताब्दी निमित्ताने संगीत रुपी आदरांजली द्यावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे व संचालक विभीषण चवरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.