मुंबई- औरंगजेबाची कबरीचे प्रकरण त्यांनी बाहेर काढले. मात्र तेच प्रकरण त्यांच्यावर उलटे शेकले गेले. त्यामुळे दिशा सालियन प्रकरण पुन्हा काही लोकांनी बाहेर काढले असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. औरंगजेब प्रकरणातून मुक्तता मिळवण्यासाठी दिशा सालियन प्रकरण शिजवले गेले असल्याचा आरोप त्यांनी केला. एखाद्या व्यक्तीच्या भविष्यावर असा चिखल उडवणे, ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे देखील राऊत यांनी म्हटले आहे.
ठाकरे कुटुंबाला आणि संपूर्ण शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते पुन्हा एकदा स्पष्ट दिसत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटले. औरंगजेबाला कबरीतून बाहेर काढून आमच्यावर सोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो त्यांच्यावरच उलटला. त्यामुळे औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे प्रकरण गेल्या काही दिवसापासून शिजवले असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. यामागे कोणाची प्रेरणा आहे? कोणाची शक्ती आहे? आणि कोण पडद्यामागे हालचाली करत होते? याची सर्व माहिती आमच्याकडे असल्याचा दावा देखील त्यांनी केला.
अशा प्रकारचे राजकारण तुम्ही करणार असाल तर ते तुम्हाला लखलाभ असो. 300 साडेतीनशे ते 400 वर्षानंतर कबरीतून बाहेर काढण्यासाठी ज्या कबरी तुम्ही खोदत आहात, त्या कबरीत तुम्हालाच जावे लागेल. एखाद्या तरुण नेत्याच्या करिअरवर आणि भविष्यावर अशा प्रकारे चिखल उडवणारी महाराष्ट्राची संस्कृती नाही. आमच्यासारख्या अनेक नेत्यांवर हे प्रयोग झाले आहेत. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. तरी देखील तुमचे आयटी सेल आणि लीगल सेल काम करत आहेत. मात्र कोणत्या थरापर्यंत जायचे हे महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी ठरवायला हवे. भारतीय जनता पक्षाचे राज्य आल्यापासून आणि भाजपमध्ये काही बाडगे गेल्यापासून तसेच एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडल्यापासून त्यांच्याकडे असलेले अस्वस्थ आत्म्यांच्या हाताला काहीही लागलेले नाही. सत्ता आली तरी देखील ते अस्वस्थ आहे. त्यामुळे त्यांना अशा कारवाया सुचत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
औरंगजेबाच्या कबरीवर दंगल कुठे झाली? तर नागपुरात झाली. दंगल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाची निवड का करण्यात आली? ही दंगल नागपूर येथेच का घडवण्यात आली? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. हे देवेंद्र फडणवीस यांना देखील अपेक्षित नसेल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा कमजोर ठरवण्यासाठी किंवा बदनाम करण्यासाठी त्यांच्याच मतदारसंघाची निवड कोणी केली? यामागे कोण आहे? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. हा तपासाचा विषय असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. अशा प्रकारची दंगल महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घडवण्याची योजना होती. मात्र त्याची ठिणगी देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात टाकण्यात आली. यामागे नक्की काय आहे? कोण आहे? कोणाचा इंटरेस्ट आहे? हा तपासाचा विषय असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.