मुंबई-अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशाच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची आणि तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती करण्यात आली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.
८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील १४ व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला. पोलिसांनी याला आत्महत्या म्हटले होते. त्यावेळी दिशाच्या वडिलांनी तपास समाधानकारक मानला होता. भाजप नेते नितेश राणे यांनी तीन वर्षांपूर्वी दिशावर सामूहिक बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप केला होता. तथापि, दिशाच्या पालकांनी नितेश राणे यांच्या विरुद्ध खटला दाखल केला होता आणि हा त्यांच्या मुलीची बदनामी करण्याचा कट असल्याचे म्हटले होते.
आता दिशाचे वडील म्हणतात की, त्यांना घरात नजरकैदेत ठेवण्यात आले आणि पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांवर विश्वास ठेवण्यास भाग पाडण्यात आले. याचिकेत सूरज पंचोली, दिनो मोरिया आणि मुंबई पोलिसांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. दिशाच्या वडिलांच्या याचिकेनंतर महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. कॅबिनेट मंत्री नितेश राणे म्हणाले, ‘आदित्य ठाकरे यांनी आमदारपदाचा राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरे जावे.’चौदाव्या मजल्यावर पडून दिशा सालियन हिचा मृत्यू झाला असल्याचा दावा आतापर्यंत करण्यात येत होता. मात्र आता दिशाच्या अंत्यविधी वेळेचे फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर एकही व्रण असल्याचे दिसून येत नाही. चौदाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला असला तरी तीच्या चेहऱ्यावर एकही जखम नाही. तिला साधे खरचटले सुद्धा नाही. या फोटोवरूनच आता तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असल्याचे बोलले जात आहे.