पुणे दि. १९ जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील मतदार यादी मध्ये असलेली दुबार नावे, मयत झालेल्या व्यक्तींची नावे, कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे या संदर्भात माहिती घेऊन मतदार याद्यांमध्ये सुधारणा करून त्या परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने आगामी काळात प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात, मतदार याद्या तयार करण्याच्या अनुषंगाने मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांच्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत श्री डूडी बोलत होते. या बैठकीला उपजिल्हाधिकारी निवडणूक श्रीमती मीनल कळसकर, विविध राजकीय पक्षांचे जिल्हा प्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. डूडी पुढे म्हणाले, मतदार यादीत दोन ठिकाणी नाव असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात येऊन एकाच मतदार यादीत नाव असेल याची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मार्फत खात्री केली जाईल. मतदार याद्यांमधील मयत मतदारांची नावे वगळण्यात येतील, यासाठी ग्रामपंचायत,नगरपरिषद, महानगरपालिका या कार्यालया कडुन मयत झालेल्या व्यक्तींच्या अभिलेख नोंदीच्या याद्या घेऊन त्याप्रमाणे मतदार यादी मध्ये मयत झालेल्या व्यक्तींची नांवे कमी करण्यात येतील. तसेच कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदारांच्या बाबतही बीएलओ मार्फत सर्वेक्षण करण्यात येऊन याद्यांमध्ये सुधारणा करण्यात येईल. या कामांसाठी प्रशासनातर्फे बीएलओंना प्रशिक्षण देण्यात येईल मतदार यादीमध्ये चुकीच्या पद्धतीने नाव समावेश केले असेल तर प्रशासनातर्फे त्यात सुधारणा करण्यात येईल. या सर्व कामामध्ये पारदर्शकता ठेवली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहनही श्री डूडी त्यांनी केले.
बैठकीत विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी, मतदार यादी मध्ये सुधारणा करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना मांडल्यात. बैठकीच्या सुरुवातीला या संदर्भातील माहितीचे निवडणूक शाखेतर्फे सादरीकरण करण्यात आले.
आगामी काळात मतदार याद्यांमध्ये सुधारणा करून मतदार याद्या परिपूर्ण करणार-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी
Date: