भालचंद्र पाठक कुटुंबियांकडून मदतीच्या वारशाची जपणूक : आर. एच. मोहम्मद
कार्यक्रमातून साधली राष्ट्रीय एकात्मता : आर. एच. मोहम्मद
पुणे : देशातील नामवंत संशोधकांपैकी भालचंद्र मोहनीराज पाठक हे एक होते. त्यांनी तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही. त्यांचे बोलणे रोखठोक असायचे. ते कष्टकऱ्यांसाठी धावून जात असत. सामाजिक शिकवणुकीचा वारसा जपत पाठक कुटुंबियांनी मदतीचे कार्य सुरू ठेवले आहे.बाबां चे संपूर्ण आयुष्यच समाजा करीता आदर्श आहे.असे गौरवोद्गार माजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, आणी आत्ताचे महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधीकरणाचे न्यायिक सदस्य आर. एच. मोहम्मद यांनी काढले. समाजा-समाजात जातीच्या भिंती उभ्या राहात असताना या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता साधली असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
भारतीय कला प्रसारिणी सभेचे दिवंगत सचिव तथा देशातील नामवंत संशोधक भालचंद्र मोहिनीराज पाठक यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त आज (दि.19) गरजू व अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व धान्य तसेच आवश्यक वस्तूंचे वाटप मोहम्मद यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जांभूळवाडीतील मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना ही मदत देण्यात आली. भारतीय कला प्रसारिणी सभेचे सचिव पुष्कराज भालचंद्र पाठक, प्राचार्य डॉ. अभिजित नातू, प्राचार्य संजय भारती मंचावर होते.
प्रास्ताविकात सचिव पुष्कराज पाठक म्हणाले, संशोधक वृत्तीचे असलेले भालचंद्र पाठक अन्यायाविरुद्ध पेटून उठत असत. निष्काम कर्मयोग या भावनेतून ते कष्टकऱ्यांमध्ये रमले. सढळ हाताने आणि निरपेक्ष भावनेने ते मदतीचा हात पुढे करीत. त्यांचा जीवनप्रवास हाच आमच्यासाठी उपदेशाप्रत आहे. त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर आमची वाटचाल सुरू आहे. कलेच्या माध्यमातून भालचंद्र पाठक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नेहाचाही उलगडा त्यांनी केला.
भालचंद्र पाठक आणि त्यांच्या परिवाराशी असलेला स्नेहभाव उलगडून आर. एच. माहेम्मद म्हणाले, भालचंद्र पाठक यांनी अनेक संकटांचा सामना करत वाटचाल केली. पाठक कुटुंबियांनीही अनेक समस्या पार करत वाटचाल सुरू ठेवली आहे. ज्यांच्यात धैर्य असते अशांचीच परिक्षा परमेश्वर पाहात असतो. पाठक कुटुंबिय तत्त्वांशी तडजोड न करता वाटचाल करीत आहेत, ही गौरवाची गोष्ट आहे.
मान्यवरांचे स्वागत पुष्कराज पाठक यांनी केले. सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले तर आभार प्राचार्य अभिजित नातू यांनी मानले.
.