दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभा सभागृहात मागणी
पुणे/मुंबई- (दि १९): आज सकाळी हिंजवडी फेज १ येथे मिनी बसला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली, यामध्ये प्रवास करणाऱ्या व्योमा ग्राफिक्स कंपनीतील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेची तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधित कंपनीमार्फत मृतांच्या कुटुंबीयांना योग्य ती आर्थिक करण्यासाठी शासनाने निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी विधानसभा सभागृहात केली. शासनाने संबंधित कंपनीवर जबाबदारी निश्चित करावी आणि कुटुंबीयांना न्याय द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून प्रशासनाने सार्वजनिक आणि खासगी वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा दुर्घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत तसेच आग लागलेल्या संबंधित वाहनाची देखभाल आणि सुरक्षा तपासणी झाली होती का, याचाही सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणी देखील यावेळी हेमंत रासने यांनी केली आहे.
हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते.

