मुंबई-बनावट कागदपत्रांच्या आधारे प्राध्यापक आणि विद्यार्थी असल्याचे भासवून लंडन येथे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आठ जणांना मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. हे सर्व विद्यार्थी हरियाणातील आहेत. यातील तिघेजण हे अल्पवयीन आहेत. मानवी तस्करीचा हा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असल्याचे सांगण्यात आले.
सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दोन तरुणांनी मुंबई विमानतळावरील इमिग्रेशन काऊंटरवर पडताळणीसाठी त्यांचा पासपोर्ट आणि व्हिसा सादर केला. त्यांच्याकडे इंग्लंडचा व्हिजिट व्हिसा होता. हरियाणातील एका विद्यापीठाचे विद्यार्थी असून प्राध्यापकांसह लंडनला जात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, इतर प्रश्न विचारल्यानंतर त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही.त्यानंतर अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्यांच्यासह आणखी ६ जण लंडनला जाणार असल्याची माहिती मिळाली. या सर्वांना गुन्हे शाखेच्या स्वाधीन करण्यात आले. त्यांच्यावर पारपत्र कायद्याच्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे प्रकरण गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आले असून ते याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. व्हिसा मिळवण्यासाठी खोटी माहिती सादर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची सुटका करण्यात आली.
बनावट कागदपत्रांच्या आधारे प्राध्यापक, विद्यार्थी असल्याचे भासवून लंडन येथे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आठ जणांना मुंबई विमानतळावर अटक
Date:

