पुणे,:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरचा सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचा परिसर सोमवारी सायंकाळी धीरगंभीर झाला होता. सायंकाळचा मंद वारा या वातावरणात आशेची झुळुक घेऊन येत राहिला. त्यासोबत तिथे पद्मश्री गिरीश प्रभुणेंचे साहित्य आणि लेखनविषयक विचार उपस्थित विद्यार्थ्यांना नव्या भारताच्या निर्मितीचे दिग्दर्शन करणारा ठरला.एक सेकंदही न टिकणाऱ्या वर्तमानात दंग न होता, खऱ्या भारताचा शोध घेण्यासाठी उघड्या डोळ्यांनी सामाजिक वास्तव पाहण्याचे व ते आपल्या लेखणीद्वारे टिपण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
पुणे विद्यापीठात आयोजित ‘मी लेखक होणारच’ या कार्यशाळेच्या निमित्ताने जमलेल्या सर्व विद्यार्थी-प्राध्यापकांसाठी हा अनुभव कार्यशाळेतील एक महत्त्वाचा प्रेरणादायी टप्पा ठरला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंठाळकर, सागर वैद्य आणि अधिष्ठाता डॉ. संजय तांबट यांनाही या प्रभुणे यांचे मार्गदर्शन हे जागेवर खिळवून ठेवणारे ठरल्याचे सोमवारी दिसून आले.
नवलेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठामध्ये राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि समर्थ युवा फाउंडेशनच्या मदतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेत प्रभुणे यांनी सावित्रीबाई फुले- महात्मा फुले यांच्या जीवनानुभवांपासून आपल्या मार्गदर्शनाची सुरुवात केली. फुले दाम्पत्याचे कार्य हे आपल्याला एखाद्या महाकाव्याप्रमाणे भासते. लेखनाच्या हिशेबाने नवलेखकांनी आपल्याकडील असे अनुभव टिपणे गरजेचे ठरेल. त्यासाठी आपल्याकडील सामाजिक समस्या, त्यामधील नाट्यमयता, योग्य शब्दांमधून आणि योग्य पद्धतीने मांडली, तर त्या आधारे दर्जेदार साहित्यनिर्मिती शक्य असल्याचे प्रभुणे यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून पटवून दिले.प्राचार्य डॉ. चाकणे यांनी प्रास्ताविक केले. मंठाळकर यांनी प्रभुणे यांचा परिचय करून दिला. डॉ. तांबट यांनी आभार मानले.