कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी तथा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने मंगळवारी प्रशांत कोरटकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. यामुळे कोरटकर याच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. आता त्याच्यापुढे पोलिसांपुढे शरण येण्याशिवाय दुसरा कोणताही पर्यात उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.
प्रशांत कोरटकर याच्यावर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकावल्याचा आरोप आहे. स्वतः सावंत यांनी एका पोस्टद्वारे ही माहिती दिली होती. त्यांनी त्याची ऑडिओ क्लिपही सार्वजनिक केली होती. तेव्हापासून चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठी प्रशांत कोरटकर फरार झाला होता. या कालावधीत त्याने कोल्हापूर न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. कोर्टाने सोमवारी (17 मार्च) त्याच्या अर्जावरील सुनावणी पूर्ण करत आपला निकाल राखून ठेवला होता. हा निकाल कोर्टाने आज दिला. त्यात कोर्टाने त्याची याचिका धुडकावून लावली आहे. यामुळे त्याच्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे.या प्रकरणाची माहिती देताना सरकारी वकील म्हणाले की, कोर्टाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला आहे. हा अर्ज फेटाळल्यानंतरही त्याने कोर्टाला आपल्या अंतरिम जामिनाची मुदत 7 दिवसांची वाढवण्याची एक नवी विनंती केली होती. यासाठी त्याने मुंबई हायकोर्टाच्या एका खटल्याचा दाखला दिला. आणि आपल्याला पुन्हा 7 दिवसांचा दिलासा देण्याची विनंती केली. त्याच्या या युक्तिवादावर आम्ही आक्षेप घेता. कोरटकरांनी दाखला दिलेले प्रकरण वेगळे होते. त्या प्रकरणात आरोपी स्वतः कोर्टापुढे हजर होता. पण इथे तशी परिस्थिती नाही. त्यामुळे हा अर्ज मंजूर करण्याचे कारण नाही. विशेषतः एकदा जामीन नाकारल्यानंतर पुन्हा परत जामीन देणे चुकीचे ठरेल अशी बाब आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. कोर्टाने आमचा युक्तिवाद मान्य करत कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला. तसेच त्याची 7 दिवसांचे प्रोटेक्शन देण्याची विनंतीही धुडकावून लावली. यामुळे त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोर्टाने नुकताच आपला आदेश दिला आहे. त्यामुळे या प्रकरणी कोर्टाने घातलेल्या अटी वगैरे पहायला मिळाल्या नाहीत. कोर्टाची ऑर्डर उद्या अपलोड होईल. त्यानंतर ती पहायला मिळेल. हा विषय अत्यंत संवेदनशील होता. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष त्याकडे लागले होते. राष्ट्रपुरुषांविषयी काही उद्गार काढणे हे योग्य नाही असे वाटले असावे. त्यात काय लिहिले आहे हे आपण अजून पाहिले नाही. पोलिसांनी या प्रकरणी लावलेल्या कलमांवर अद्याप उहापोह झाला नाही. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर त्यावर उहापोह होईल.पत्रकारांनी यावेळी वकिलांना प्रशांत कोरटकरने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली तर त्याला तिथे अटकेपासून संरक्षण मिळू शकते का? असा प्रश्न केला. त्यावर हा मुद्दा हायकोर्टाच्या अखत्यारीतील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशांत कोरटकर मुळचा माहुरचा आहेत. त्याने हिंगणघाट येथे शिक्षण घेतले. चंद्रपूर येथून त्यांनी जनसंपर्क विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांनी 2000 साली नागपूरमधून टीव्ही पत्रकारिता सुरु केली. त्यांनी वेगवेगळ्या वृत्तवाहिनीमध्ये काम केले. त्यानंतर ‘विदर्भ माझा’ या यूट्यूब चॅनलचा ही संपादकही होता . कोरटकर सोशल मीडियावर विशेषतः फेसबुकवर खास सक्रीय होता . याशिवाय त्याचा उच्च पदावरील नेते व अधिकारी यांच्याशी ही चांगला संपर्क आहे.त्याने एका विदेशी विद्यापीठाकडून पी. एच. डी. मिळवली आहे.