मुंबई-सरकार आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहे. हे अपयश लपवण्यामध्ये आणखी अपयशी ठरत आहे. भाजपला प्रश्न विचारायचा आहे. तुमचे हिंदुत्व आणि हिंदुत्वाचे ढोंग आम्ही पाहिलेले आहे. तुम्हाला हिरव्या रंगाचा एवढा राग असेल, तर प्रथम तुमच्या झेंड्यावरचा हिरवा काढून दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. भाजपने आधी पक्षाच्या झेंड्यातील हिरवा रंग काढावा, मग हिंदू-मुस्लिम करावे, असा टोला ठाकरे यांनी लगावला.एका बाजुला हिंदुस्थान-पाकिस्तान करायचे आणि पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच खेळायची. ती मॅच दुबई करायची आणि त्या मॅचला ह्यांची पोरं हजेरी लावणार. म्हणजे अमित शहांचा मुलगा हा मॅच आयोजित करणार. इकडे गरिबांच्या मुलांना हिंदुस्थान-पाकिस्तान करून लढवायचे आणि तिकडे दुबईत जाऊन मॅच बघायची. हे हिंदुत्व कोणते? बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत. ही माहिती आल्यानंतर त्याच बांगलादेशसोबत मॅच खेळायची. त्यात शेख हसीनांना इकडे सहारा दिला. सर्वसामान्यांच्या घराची होळी करायची आणि त्याच्यावर तुम्ही राजकारणाची पोळी भाजायची, हे अत्यंत घृणास्पद राजकारण आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली.
नागपूर दंगलीवरून उद्धव ठाकरे यांनी आज महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला. थडगे काढण्यासाठी आंदोलने करण्यापेक्षा केंद्र सरकारकडे जाऊन औरंगजेबाचे थडगे काढण्याची मागणी करा, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला. औरंगजेबाच्या कबरीला केंद्र सरकार संरक्षण देतेय, तर मग औरंगजेब तुमचा कोण लागतो. नागपूरची घटना पूर्वनियोजित असेल, तर तुमचे गृह खाते झोपा काढत होते का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, गुजरातमध्ये जन्मलेला औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष करून बलाढ्य सत्तेला नमवून जे हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते, त्या स्वराज्यावर महाराजांच्या निधनानंतर चालून आला होता. औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता, पण महाराष्ट्राच्या मातीचा एक कणही जिंकू शकला नाही. महाराजांपासून स्फूर्ती आणि प्रेरणा घेतलेल्या असंख्य मावळ्यांनी त्याला मूठमाती दिली. अशा औरंगजेबाचे समर्थन कोणीही शिवप्रेमी करणार नाही. त्यामुळे कोणी त्याचे थडगे काढण्याची भाषा करत असेल, तर बोलणे आणि आंदोलन करण्यापेक्षा डबल इंजिन सरकार नुसते वाफा सोडतेय का?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाची कबर उघडण्यामध्ये असमर्थता दाखवली आहे. त्या कबरीला केंद्राचे सरंक्षण आहे. केंद्र सरकार औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देणार असेल, तर मग केंद्र सरकार किंवा भाजपला आम्ही विचारतोय की, तो औरंगजेब तुमचा कोण लागतो. औरंगजेब असो, अफज़ल खान असो, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे आहेत. ते नष्ट करायचे असेल, आंदोलन काय करताय? तुम्ही केंद्र सरकारकडे जा, मोदींकडे जा आणि त्यांना म्हणा की, गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब ज्याला महाराष्ट्राने मुठमाती दिली. त्याची कबर तुम्ही उद्ध्वस्त करा. कबर उखडण्याचा जेव्हा सोहळा कराल, तेव्हा चंद्राबाबू आणि नीतेश कुमारांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा. औरंगजेबाची कबर हटवणे सोपा विषय आहे. त्यात दंगल करायचे कारण काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
गृहमंत्र्यांचे घर आणि आरएसएसचे मुख्य कार्यालय हे नागपूर आहे. अशा नागपूरमध्ये हिंदू खतरे में कसा काय? मग इतके वर्ष तुम्ही नेमके केले काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. नागपूरची घटना पूर्वनियोजित असेल, तर तुमचे गृह खाते झोपा काढत होते का? हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला कसा नाही? जर आला असेल, तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले का? अशी प्रश्नांची सरबत्ती उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केली.