पुणे -जिल्ह्यातील आंबेगाव परिसरात मंचरमधील एका नामांकित डाॅक्टरचे सराईत गुन्हेगाराने अपहरण करून २० लाखांची खंडणी मागत गोळीबार केल्याचा प्रकार घडला होता.या डॉक्टरकडून एक लाखांची खंडणी घेऊन त्यांना निर्जन स्थळी सोडून पसार झालेल्या आरोपीला अटक करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपीच्या ताब्यातून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रवीण उर्फ डाॅलर सीताराम ओव्हाळ (वय ३२, रा. वाळद, ता. खेड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत संबंधित डाॅक्टरने मंचर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली होती. तक्रारदार डाॅक्टर ४ जानेवारी रोजी पेठ ते मंचर या मार्गावरून दुचाकीवरून जात होते. मोटारचालक आरोपी पवन सुधीर थोरात (रा. मंचर, जि. पुणे) आणि ओव्हाळ त्यांच्या मागावर होते.दुचाकीस्वार डाॅक्टरला कारने जोरात धडक दिल्याने ते रस्त्यात पडल्यावर त्यांचे जबरदस्तीने अपहरण करून निघोटवाडी परिसरात चोरट्यांनी नेले. तेथे त्यांना बेदम मारहाण करुन २० लाख रुपयांची खंडणी मागितली. डाॅक्टरांना धमकावून त्यांनी पिस्तुलातून एक गोळी देखील हवेत झाडली, तसेच त्यांच्याकडून एक लाख रुपयांची खंडणी उकळली. त्यानंतर पेठ घाटात डाॅक्टरला सोडून आरोपी थोरात आणि ओव्हाळ कारमधून पसार झाले.पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. आरोपी ओव्हाळ आणि थोरात सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले आहेत.फरार झालेला आरोपी थोरात याला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली. त्याच्याबरोबर असलेला ओव्हाळ पसार झाला होता. गेले दोन महिने पोलीस ओव्हाळच्या मागावर होते. पसार झालेला ओव्हाळ आळेफाटा एसटी स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी अक्षय नवले यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून ओव्हाळला पकडले. त्याच अंगझडती घेण्यात आली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.
पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस कर्मचारी दीपक साबळे, अक्षय नवले, संदीप वारे, राजू मोमीन, मंगेश थिगळे, विक्रम तापकीर, नीलेश सुपेकर यांनी ही कामगिरी केली. प्रकरणाचा पुढील तपास आळेफाटा पोलिसांकडून करण्यात येत आहे. आरोपी ओव्हाळ याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.