पुणे-जिल्ह्यातील मुळशी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर खोटी कागदपत्रे व भ्रष्टाचारातून प्रवेश घेतले जात असल्याची तक्रार आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली होती. मागील वर्षी सुद्धा काही पालकांनी खोटी कागदपत्रे तयार केल्याने गुन्हे दाखल करण्यात आले होते. या संदर्भात आज आम आदमी पार्टी / आप पालक युनियन तर्फे शिक्षण संचालक शरद गोसावी यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा केली व निवेदन दिले. काही प्रशासनातील अधिकारीही या अवैध फेरफार करण्याला मदत करीत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला होता. पालक प्रशासनाच्या भीतीमुळे पुढे येत नाहीत. शासकीय कागदपत्रे तयार करणाऱ्या अवैध एजंट यामध्ये अधिकाऱ्यांना सहकार्य करीत आहेत. या आरोपाची दखल घेत संचालक शरद गोसावी यांनी तातडीने नाईकडे, जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधला व सदरच्या जागीचे बदली केले गेलेले शिक्षण विस्तार अधिकारी अशोक गोडसे यांना जुन्नर येथे तातडीने रुजू होण्यास सांगण्यात आलेले आहे. त्यांच्या संदर्भात पालकांनी तक्रारी केल्या होत्या. श्रीमती मोमीन यांना मुळशी येथील अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.
आरटीई पहिल्या लॉटरीमध्ये प्रवेश मिळालेल्या पालकांनी शाळा प्रवेश घेण्याची मुदत संपली असून आता प्रतीक्षा यादीतील प्रवेश सुरु होणार आहेत. असे असताना काल दिनांक 16 तारीख अखेर मुळशी भागातील 676 रिक्त जागापैकी केवळ 92 जागी प्रवेश झाले होते. परंतु आज तक्रारीची दखल घेत पडताळणी पूर्ण झालेल्या पाल्यांचे शाळा प्रवेश करून घेण्यात येत असल्याचे शरद गोसावी यांनी सांगितले.चुकीच्या व फेरफार झालेल्या अवैध कागदपत्रांवर दिलेले प्रवेश तातडीने रद्द करावेत तसेच पडताळणी समितीमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. यात त्रुटी राहिल्यास आणि भ्रष्टाचाराबाबत अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी आप पालक युनियन यांनी केली आहे.
यावेळी आप पालक युनियन चे मुकुंद किर्दत , श्रीकांत भिसे, गणेश खेंगरे, हनुमंत शिंदे, प्रभाकर तिवारी उपस्थित होते