नामदेव ढसाळ यांच्या वरील चित्रपट ‘चल हल्ला बोल’ प्रदर्शित करण्याची विधानसभेत मागणी
मुंबई दिनांक – १८/०३/२०२५
मराठी साहित्य विश्वातील क्रांतिकारी बंडखोर कवी तथा दलित पँथर चळवळीचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘चल हल्ला बोल’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारून दलितांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला आहे, असे वक्तव्य करून चित्रपटाला कुठलीही कात्री न लावता हा चित्रपट तात्काळ प्रदर्शित करण्याची मागणी राज्याचे माजी मंत्री आणि आमदार डॉ. नितीन राऊत यांनी आज विधानसभेत केली.
‘चल हल्ला बोल’ चित्रपट १ जुलै २०२४ रोजी मान्यतेसाठी सेन्सॉर बोर्डाकडे सबमिट करण्यात आला होता. हा चित्रपट ६ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र, सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. चित्रपट सिनेमा रिवायजिंग कमेटीकडे दिला असून त्याची रीतसर फी देखील भरण्यात आली असल्याचे डॉ. राऊत यांनी आज सभागृहाला सांगितले.
पुढे बोलतांना डॉ. राऊत म्हणालेत लोकांचा सिनेमा’ या चळवळीच्या माध्यमातून लेखक, दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी लोक वर्गणीतून ‘चल हल्ला बोल’ हा सिनेमा बनविला. “गोलपीठा ” या कविता संग्रहातून काही कवितांचा समावेश या चित्रपटात करण्यात आला आहे.
दलित पँथर, युवक क्रांती दल या चळवळींच्या पार्श्वभूमीवर दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, अल्पसंख्यांक, मुस्लिम, शेतकरी, स्त्रिया आदींच्या शोषणाविरुद्ध लढ्याची भूमिका या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. मात्र सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला परवानगी नाकारली. नामदेव ढसाळ हे केवळ कवी नव्हते, तर दलित पँथर चळवळीचे एक महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या कवितांनी दलितांचे दुःख, अन्याय आणि विद्रोह मांडला. अशा व्यक्तिमत्त्वावर आधारित चित्रपटाची अडवणूक करणे म्हणजे दलितांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न सेन्सॉर बोर्ड करित आहे. यावेळी डॉ. राऊत यांनी चित्रपटाला कुठलीही कात्री न लावता तात्काळ प्रदर्शित करण्याची मागणी विधानसभेत केली.
अधिकारी म्हणतात, कोण ढसाळ?
सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी रेवणकर व सय्यद रबी हश्मी यांनी चित्रपट निर्मात्यांना पाठवलेल्या एका नोटीसीत नामदेव ढसाळ कोण हेच आम्हाला माहिती नसल्याचा अजब दावा केला. ढसाळ यांना वर्ष १९९९ मध्ये पद्मश्री आणि वर्ष २००४ मध्ये साहित्य अकादमीचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे.
सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी यांना जर दलित साहित्यामध्ये आणि मराठी साहित्याला विद्रोहाचा आयाम देणारे पद्मश्री नामदेव ढसाळ माहित नसतील, तर त्यांना त्या पदावर राहण्याचा काडीमात्र अधिकार नाही. अकलेचे तारे तोडत कोण नामदेव ढसाळ ? अशी विचारणा करून पद्मश्री नामदेव ढसाळ यांची अवहेलना करणाऱ्या सेन्सर बोर्ड अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ.नितीन राऊत यांनी आज विधानसभेत केली.