मुंबई: महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी (ता. १८) कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात आमदार बापूसाहेब पठारे यांनी सरकारकडे महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. १९ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री कोयता गॅंगकडून झालेल्या तोडफोडीच्या घटनेवरून त्यांनी सर्वांचे विशेष लक्ष वेधले.
सदर घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, की “धानोरी व लोहगाव परिसरातील साठेवस्ती, कलवड वस्ती या ठिकाणी डिसेंबर महिन्यात अमली पदार्थ सेवन करून कोयता गॅंगने दुकानाच्या, वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. येरवडा, विश्रांतवाडी तसेच टिंगरेनगर या भागांमध्येही अशाच पद्धतीच्या अनेक घटना घडून येत आहेत. वारंवार तक्रारी करूनही या गोष्टीला आळा बसत नाही.” गुन्हेगारांवर कारवाई करण्यासंबंधी व या वाढत्या उपद्रवावर आळा घालण्यासाठी लोहगाव भागात स्वतंत्र पोलीस स्टेशन उभारण्याची मागणी पठारे यांनी सरकारपुढे मांडली.
तसेच, अमली पदार्थांवर आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यासंबंधी यंत्रणा उभी करण्याबाबत मागणी केली. एकूणच वडगावशेरी मतदारसंघात अशा पद्धतीच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत सक्षमता आणणे व नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे फार गरजेचे असल्याचे,पठारे यांनी सांगितले.यावर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत राज्य सरकार याबाबत सजग असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी असे नमूद केले, की या घटनांमध्ये विधी संघर्षित बालकांचा सहभाग असल्याचे आढळले असून, दिशा कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यात सुधारणा घडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
लोहगाव भागाचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या व सतत घडणाऱ्या व घडू शकणाऱ्या गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची आवश्यकता दिसून येते. सध्याच्या परिस्थितीत उपलब्ध पोलीस दलावर मोठा ताण असून, लोहगावसह आजूबाजूच्या भागांसाठी लोहगाव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून वेगळी यंत्रणा निर्माण झाल्यास, कायदा-सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखता येऊ शकते.