पुणे : स्नेहालय, अहिल्यानगर संचलित स्नेहाधार पुणे परिवारातर्फे ‘स्नेहाधार गौरव पुरस्कार’ वितरण सोहळा शनिवार, दि. 22 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम सायंकाळी 5:30 वाजता निवारा सभागृह, नवी पेठ येथे होणार आहे. पेण येथील प्रामुख्याने महिलांसाठी काम करणाऱ्या ‘अहिल्या महिला मंडळ’ या संस्थेच्या संस्थापिका वासंती श्रीकांत देव आणि कळसंबर (ता. बीड) येथे अनाथांसाठी ‘आपला परिवार’ या वृद्धाश्रमाची स्थापना करणाऱ्या मनीषा भाऊराव पवार यांना ‘स्नेहाधार गौरव पुरस्कार’ सन्मापूर्वक प्रदान केला जाणार आहे. निष्णात गिर्यारोहक, गिरीप्रेमी संस्थेचे संस्थापक उमेश झिरपे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे, अशी माहिती स्नेहाधार, पुणेच्या सहसंचालिका गौरी पाळंदे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
माहेर आणि सासरकडून मिळालेला सामाजिक कार्याचा वारसा वासंती देव पुढे चालवित आहेत. समाजातील महिलांना आत्मनिर्भर करावे आणि त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करावा या हेतूने वासंती देव यांनी समविचारी महिलांना एकत्र करून शिक्षण, आरोग्य, समाजस्वास्थ आणि स्त्री सक्षमीकरण या चतु:सुत्रीचा अवलंब करत पेण येथे सुमारे 25 वर्षांपूर्वी अहिल्या महिला मंडळाची स्थापना केली.
मनिषा पवार या बीड तालुक्यातील कळसंबर येथे ‘आपला परिवार’ नावाने वृद्धाश्रम चालवत आहेत. ज्यांचे जगाच्या पाठीवर कोणीही नाही अशा अंध, अपंग, बेघर व निराधार आजी-आजोबांचे वृद्धाश्रामत वास्तव्य आहे. पवार यांनी या कार्यासाठी स्वतःचे घर, दोन एकर जमीन संस्थेला दान केली आहे. आजी-आजोबा हिच आपली मुले आहेत या भावनेतून त्यांनी स्वत:ला मूल होऊ दिले नाही आणि आयुष्य समाजासाठी समर्पित केले आहे.