‘समाजभूषण’ पुरस्काराचे मानकरी भावेश ओझा यांचे प्रतिपादन
पुणे-‘सध्या सामाजेचा तोल ढळताना दिसत आहे, ही चिंतेची बाब आहे. पूर्वी नाना, आबा, अप्पा अशी नावे ऐकू यायची. आता मात्र भाई, खोक्या, आका ही नावे कानावर आदळत आहेत. ही समाजाची अधोगतीच मानली पाहिजे.यातून समाजाला सावरण्यासाठी श्री स्वामी समर्थांचे स्मरणच समाजाला योग्य मार्ग दाखवेल,’ असे प्रतिपादन औंधमधील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते भावेश ओझा यांनी आज केले. औंधमधील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानतर्फे त्यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार रामदासजी मुरकुटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. श्रीकांत गोविंद पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
भावेश ओझा म्हणाले की, ‘संस्कार कमी पडत असल्यामुळे समाजात अनैतिकता, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, वाढत असून, चांगल्या समाजनिर्मितीसाठी प्रत्येकाने श्री स्वामी समर्थांचे स्मरण सतत करण्याचे गरजेचे आहे. त्यांच्या स्मरणाने मनाला आधार मिळतोच, शिवाय चांगले संस्कारही मनावर घडतात,’ असे सांगून त्यांनी गेली २५ वर्षे चालू असलेल्या श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या सातत्यपूर्ण कार्याचा गौरव केला.‘मला मिळालेला ‘समाजभूषण’ पुरस्कार श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करीत आहे,’ असे ते म्हणाले.
प्रारंभी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ॲड. श्रीकांत गोविंद पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले की,‘उच्चशिक्षित व परदेशात असणारी उत्तम संधी सोडून उद्योजक भावेश ओझा भारतात परतले. पुण्यात औंध येथे स्थायिक झाले असून, ते सातत्याने औंधच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिले आहेत. तसेच धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील ते योगदान देत आहेत. त्यांचे कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व श्री स्वामी समर्थांच्या कृपेने सतत फुलत राहील,’ असे ते म्हणाले. संस्थेच्या २५ वर्षांच्या वाटचालीचा आढावाही त्यांनी घेतला.
याप्रसंगी ज्ञानेश्वर तापकीर यांचेही भाषण झाले. हृषीकेश कोल्हे यांनी मानपत्राचे वाचन केले. गंधाली भिडे यांनी सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन केले. औंधमधील उमाशंकर कॉम्प्लेक्स परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ज्ञानेश्वर तापकीर, सुहास ढोले, तानाजी चोंधे, दत्तात्रय तापकीर, वसंत माळी, दीपक कालापुरे, निवृत्ती कालापुरे, संग्राम मुरकुटे, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी व सचिव दिलीप वाणी यांसह शेकडो स्वामीभक्त उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता स्वामींच्या आरतीने आणि महाप्रसादाने झाली.