मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी नागपूर येथील हिंसाचाराच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपची महाराष्ट्राचा मणिपूर करण्याची इच्छा आहे. त्यांना ज्या ठिकाणी सत्ता राबवता येत नाही, त्या ठिकाणी ते दंगली घडवतात, असे ते म्हणालेत.खुलताबाद स्थित औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरून सोमवारी रात्री नागपूर येथे हिंसाचार झाला. त्यात पोलिसांसह अनेकजण जखमी झाले. या प्रकरणाचे विधिमंडळातही तीव्र पडसाद उमटलेत. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. ते विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले, नागपुरात हिंसाचाराची घटना घडली. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून कोणताही प्रतिसाद किंवा माहिती देण्यात आली नाही. जेव्हा अफवा पसरल्या तेव्हाही मुख्यमंत्री कार्यालयाने आपली प्रतिक्रिया दिली नाही. असे का झाले? असा प्रश्न मला पडला आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाचे काम मी अगदी जवळून पाहिले आहे. राज्यात एखाद्या ठिकाणी अशी घटना घडते, तेव्हा तत्काळ मुख्यमंत्री कार्यालयाला त्याची माहिती मिळते. गृह विभागालाही माहिती व रिपोर्ट मिळतो. त्यामुळे या विभागांना असे काही होणार आहे याची कल्पना आली नाही का? नागपूर हे तर स्वतः मुख्यमंत्री महोदयांचे शहर आहे. देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री व गृहमंत्री आहेत.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, भाजपला महाराष्ट्राचा मणिपूर करण्याची इच्छा आहे असा माझा आरोप आहे. मागील वर्षभरात मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. तिथे कुणाला जाळले जात आहे, तर कुणाला मारून टाकले जात आहे. आता तिथे एखादी गुंतवणूक जाईल का? कुणाला तिथे पर्यटनाला जाता येईल का? याचे उत्तर नाही असेच आहे. हेच आता त्यांना महाराष्ट्रात करायचे आहे. त्यांना महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती निर्माण करायची आहे. कारण, जिथे भाजपला सत्ता राबवता येत नाही, तिथे दंगली घडवण्याचे काम केले जाते.
भारत एक शक्तिशाली देश आहे. पण भाजपवाले आपल्या देशातील शक्ती तोडू पाहत आहेत. देशातील लोकांना धर्माच्या नावाखाली विभागले जात आहे. देशातील लोकांना जातीपातील विभागले जात आहे. असे केल्याने देशाची खरी ताकद जगाला दाखवता येणार नाही. भाजप सरकारचे हे अपयश आहे. महाराष्ट्रात मागील 3-4 महिन्यांपूर्वी भाजपचे सरकार स्थापन झाले. तेव्हापासून महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत वाढ झाली आहे. शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. शेअर बाजारातही मोठी पडझड सुरू आहे. या सर्व गोष्टी पुढे येऊ नयेत. या ज्वलंत प्रश्नांकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे, यासाठी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उखरून काढण्यात आला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.