आ. शिरोळे यांच्या लक्ष्यवेधीवर गृह राज्यमंत्र्यांचे आश्वासन
मुंबई : राज्यातील शहरी भागांतील सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसंदर्भात सर्वसमावेशक धोरण विकसित केले जाईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिले.आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना ते बोलत होते.
पुणे शहरात सुमारे दहा हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यात पोलीस विभाग, जिल्हा नियोजन, महापालिका, मेट्रो , एसटी, आणि इतर संस्था सीसीटीव्ही कॅमेरे बसवतात. मात्र, यापैकी अनेक कॅमेरे बिघडलेले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखभाल करणार कोण , याबाबत टाळाटाळ केली जाते. यातून सुरक्षिततेचे गंभीर विषय निर्माण होउ शकतात, याकडे आमदार शिरोळे यांनी लक्ष्यवेधी मांडताना लक्ष वेधले.
सर्व सीसीटीव्ही कॅमेर्यांची जबाबदारी पोलीस खात्याकडे सोपविली पाहिजेत आणि त्याच्या देखभालीसाठी एक सर्वसमावेशक धोरण असले पाहिजे अशी मागणी शिरोळे यांनी केली. रात्रीच्या वेळीही निगराणी राखता येईल असे उच्च तंत्रज्ञान वापरले जावे तसेच सॉफ्टवेअरमध्ये आर्टीफिशिअल इंटेलिंजन्सचा वापर कसा करता येईल, यासाठीही धोरण आखले जावे, अशीही सूचना शिरोळे यांनी केली. वाढते शहरीकरण लक्षात घेता पुण्या मध्ये अजून दहा हजार कॅमेरे बसवण्यात यावे अशी मागणी शिरोळे यांनी केली. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सकारात्मक भूमिका मांडली. सीसीटीव्ही बसवण्याबाबत एस ओ पी करण्यात येतील आणि पुणे शहरात ए आय युक्त कॅमेरे बसवण्यात येतील असेही आश्वासन त्यांनी दिले.