‘एमपीएससी’च्या रिक्त पदांवरील सदस्यांची नियुक्ती तातडीने केल्यास
परीक्षा, मुलाखतींची प्रक्रिया गतिमान होऊन विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
मुंबई, दि. 17 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून राज्यसेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांना न्याय देण्यासाठी ‘एमपीएससी’च्या तीन रिक्त सदस्यपदांवरील नियुक्ती तातडीने करण्यात यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. ही नियुक्ती तातडीने झाल्यास परीक्षा, मुलाखती, निकालाची प्रक्रिया गतिमान होऊन स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.
‘एमपीएससी’द्वारे उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, पोलिस निरिक्षक, प्राध्यापक अशा राज्यसेवेतील महत्वाच्या पदांवरील नियुक्त्या करण्यात येतात. त्यासाठी ‘एमपीएससी’मध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्यांची पदे मंजूर आहेत. मंजूर पाच पदांपैकी अध्यक्ष आणि दोन सदस्यांची पदे भरलेली आहेत, तर सदस्यांची तीन पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे आयोगाच्या कामकाजावर विपरित परिणाम होत असून परीक्षांना विलंब होत आहे. मुलाखती, निकालाची प्रक्रिया रखडत आहे. त्यामुळे ही पदे तातडीने भरावीत अशी मागणी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध संघटनांकडून निवेदनांद्वारे केली जात आहे. या मागण्यांची दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून ‘एमपीएससी’तील तीन सदस्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी विनंती केली आहे.
