अन्याय सहन करू नका, स्वाभिमानासाठी उभे राहा”; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

Date:

नाशिकमधील ‘आम्ही साऱ्याजणी’ कार्यक्रमात डॉ. नीलम गोऱ्हे यांचे महिलांना मार्गदर्शन

नाशिक : जागतिक महिला दिनाच्या औचित्याने नाशिक शहर महिला संघटनेने २१ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ‘आम्ही साऱ्याजणी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना त्यांनी स्त्रियांच्या प्रगतीच्या दिशेने चाललेल्या जागतिक आणि स्थानिक स्तरावरील चळवळींचा वेध घेतला आणि महिलांसाठी असलेल्या कायदेशीर, सामाजिक आणि आर्थिक संधींवर विशेष प्रकाश टाकला.

कार्यक्रमाची सुरुवात शंखनाद, दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन आणि स्वागत गीताने झाली. मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या भाषणात स्त्रियांच्या समानतेच्या लढ्यातील विविध पैलूंवर भर दिला.

स्त्रियांच्या हक्कांसाठी जागतिक चळवळ आणि सामाजिक स्थिती

यावेळी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “१९७५ ते १९८५ हा दशकभराचा काळ महिलांच्या हक्कांसाठी जागतिक चळवळीचा होता. समानता, शांतता, विकास आणि मैत्री या तत्वांवर महिलांचे संघटन जगभरात मजबूत होत गेले.” त्या पुढे म्हणाल्या की, शिक्षण, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्तरावर महिलांना अनेक आव्हाने होती. जरी हुंडाबळी, सतीप्रथा यासारख्या काही कुप्रथा बंद झाल्या असल्या तरीही अजूनही बलात्कार, कौटुंबिक हिंसा आणि लैंगिक शोषण यासारख्या समस्या महिलांसमोर उभ्या आहेत.

त्यांनी महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात उदाहरण देताना सांगितले की, “महिला अनेकदा म्हणतात की आमच्यावर हिंसाचार झाला नाही, पण होईल अशी भीती वाटली होती.” ही मानसिक भीतीच मोठ्या प्रमाणावर स्त्रियांना दडपून ठेवते.

“ऑनर किलिंग आणि वर्णद्वेषाच्या मानसिकतेत बदल आवश्यक”

स्त्रियांच्या सामाजिक स्वातंत्र्याबाबत बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी ऑनर किलिंगच्या वाढत्या घटनांचा उल्लेख केला. “आम्ही बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या नावाने बोलतो, पण प्रत्यक्षात जात, धर्म, वर्ण, आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या चौकटीत स्त्रियांना बांधून ठेवतो. तसेच त्यांनी भारतीय समाजातील वर्णद्वेषावरही प्रकाश टाकला. “

“स्त्रियांना निर्णय प्रक्रियेत संधी मिळाली पण मानसिक हिंसा अजून कायम”

डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “स्त्रियांनी विविध क्षेत्रांमध्ये मोठी मजल मारली आहे, पण कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत त्यांना अजूनही संपूर्ण सहभाग मिळालेला नाही.” त्या पुढे म्हणाल्या की, जरी आजच्या काळात शारीरिक हिंसा कमी झाली असली तरीही मानसिक हिंसा वाढलेली आहे.

“कायद्याचे संरक्षण आणि आर्थिक स्वावलंबन आवश्यक”

“कायदे जरी स्त्रियांच्या बाजूने असले, तरी त्यांच्या अंमलबजावणीची मोठी अडचण आहे. अनेक वेळा आरोपी आणि त्यांचे वकील कायद्यातील त्रुटींचा फायदा घेतात.” असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. त्यांनी कौटुंबिक कायद्यांबद्दल सांगताना मुलींच्या संपत्तीच्या हक्काचा मुद्दा उपस्थित केला.

“स्त्रिया डिजिटल आणि तांत्रिक क्षेत्रात पुढे गेल्या पाहिजेत”

डॉ. गोऱ्हे यांनी डिजिटल साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले. “स्त्रियांनी तंत्रज्ञानाचा वापर करून आपली उपस्थिती वाढवली पाहिजे. सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास महिलांचे नेतृत्व आणखी दृढ होईल.”

“पुरुष सहकार्याने समानता साधता येईल”

स्त्री-पुरुष समानतेवर बोलताना त्या म्हणाल्या, “महिलांनी सार्वजनिक जीवनात यायलाच हवं, पण यासाठी पुरुष सहकार्य देखील गरजेचं आहे. समाजाची मानसिकता बदलणं आवश्यक आहे.”

त्यांनी कोरोना काळात पुरुषांच्या भूमिकेतील बदलांचाही उल्लेख केला. “पुरुषांनी लक्षात घेतलं की मुलांवर संस्कार करणं हे आईपुरतं मर्यादित नाही. यामुळे कुटुंबसंस्थेत सकारात्मक बदल घडतो आहे.”

“स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी पुढे यायला हवं”

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांना आवाहन केले की, “स्त्रियांनी आपल्यासाठी काय योग्य आहे हे ठरवलं पाहिजे. चांगल्या- वाईट चौकटींमध्ये स्वतःला अडकवून घेऊ नका. अन्याय सहन करू नका, स्वतःच्या स्वाभिमानासाठी उभं राहा.”

कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला नाशिक शहर महिला संघटनेच्या संस्थापिका प्रभाताई कुलकर्णी, अध्यक्ष सीमा शिंपी, उपाध्यक्ष पद्मा सोनी, सचिव वृंदा लवाटे, सहसचिव संजीवनी कुलकर्णी, कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. संध्या खेडेकर, शीतल जगताप आणि महिला मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रेवती पारखे यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धनाबाबत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

पुणे, दि. १८: बायोफ्लॉक मत्स्यसंवर्धन या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण...

खऱ्या भारताचा शोध घेण्यासाठी उघड्या डोळ्यांनी सामाजिक वास्तव पहा -पद्मश्री गिरीश प्रभुणे

पुणे,:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरचा सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचा...