पुणे, ता. १७: शिपाई, क्लार्क यासह अन्य कर्मचाऱ्यांची भरती करावी, बँक व्यवस्थापनाने मनमानी कारभार थांबवावा, कर्मचार्यांशी केलेल्या करारांचे पालन व्हावे, ग्राहकांस चांगल्या व सुरक्षित सेवा द्याव्यात, अशा विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने सोमवारी बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्यालय ‘लोकमंगल’समोर धरणे आंदोलन करण्यात आले. ५१ झोनल ऑफिसमधील सुमारे ६०० पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. जोरदार घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी निदर्शनेही केली.
या तीव्र निदर्शनांनंतर सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली. बँकिंग युनियन्सचे प्रतिनिधी कॉम्रेड कृष्णा बारूरकर (महासचिव, बीओएमओए) आणि संतोष गदादे (महासचिव, बीओएमओओ), ‘सीटु’चे अजित अभ्यंकर व इतर केंद्रीय कामगार संघटनांच्या नेत्यांनीही या आंदोलनाला साथ दिली. त्यांनी ठेका पद्धतीने नोकरभरती करण्यास तीव्र विरोध व्यक्त केला आणि आवश्यक असल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स, पुणे चे संयोजक कॉम्रेड विठ्ठल माने व सहसंयोजक कॉम्रेड शिरीष राणे यांनी कायमस्वरूपी भरतीच्या सामूहिक मागणीवर भर दिला.
फेडरेशनचे सरचिटणीस कॉम्रेड देविदास तुळजापूरकर यांनी “सार्वजनिक क्षेत्रातील बँका नफ्यात आहेत, पण त्याचा फायदा नेमका कोणाला होतो, हे समजून घेतले पाहिजे. कंत्राटी व आउटसोर्स कर्मचाऱ्यांकडून कायमस्वरूपी बँकिंग कामे करवून घेतली जात आहेत. बँकेने सफाई कर्मचाऱ्यांची पदे पूर्णतः रद्द केली आहेत. ८०० हून अधिक शाखांमध्ये चपराशी नाहीत. ३०० हून अधिक शाखांमध्ये एकही लिपिक नाही. १,३०० हून अधिक शाखांमध्ये केवळ एकच कर्मचारी सर्व कामकाज हाताळतो, ही बाब गंभीर आहे.”
या भीषण कर्मचारी तुटवड्यामुळे कर्मचाऱ्यांवर प्रचंड मानसिक व शारीरिक ताण आहे, तसेच ग्राहक सेवा आणि बँकिंग कार्यक्षमतेवरही मोठा परिणाम होत आहे. मात्र, बँक व्यवस्थापन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. याशिवाय, व्यवस्थापनाने उच्च न्यायालयाचे आदेश, कामगार कायदे आणि द्विपक्षीय करारांकडे दुर्लक्ष करून मनमानी निर्णय घेतले आहेत. हा मनमानी कारभार थांबवला पाहिजे, असे तुळजापूरकर यांनी ठणकावून सांगितले.
या आंदोलनात दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. आंदोलन यशस्वी होण्यासाठी संयोजन सचिव कॉम्रेड शैलेश टिळेकर, सचिव धनंजय कुलकर्णी, महेश पारखी आणि पुण्यातील इतर सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
देशव्यापी संपाची घोषणा
या गंभीर परिस्थितीच्या निषेधार्थ महाबँकेचे कर्मचारी २० मार्च रोजी देशव्यापी संपावर जाणार आहेत. २१ मार्च रोजी बँकिंग सेवा पूर्ववत होईल. त्यानंतर २२ आणि २३ मार्च या शनिवार-रविवारच्या नियमित सुट्यांनंतर २४ आणि २५ मार्च रोजी दोन दिवसांचा संप पुकारण्यात येईल, त्यामुळे बँकिंग सेवा पूर्णतः ठप्प राहील, असा निर्णय या सभेत घेण्यात आला.