मुंबई- महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. विधानपरिषदेच्या पाच पैकी तीन जागांसाठी भाजपनं काल उमेदवार जाहीर केले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेनं चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या पाच जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.पुण्यातून राष्ट्रवादी दीपक मानकर यांना उमेदवारी देईल अशी अपेक्षा आणि मागणी होती तर भाजपा जगदीश मुळीक यांना उमेदवारी देईल अशी अपेक्षा होती मात्र या दोहोंना पुन्हा डावलले गेले आहे. एवढेच काय भाजपने जेष्ठ नेते माधव भंडारींनाही पुन्हा डावललं, दरम्यान, विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असली तर विरोधी पक्षांनी मात्र उमेदवार देण्याचं धाडस दाखवलेलं नाही. याचं कारण विधानसभेत महाविकास आघाडीच्या घटकपक्षांच्या आमदारांची संख्या कमी आहे. त्यामुळं उमेदवार दिला तरी यश मिळणार नसल्याची खात्री असल्यानं महाविकास आघाडीनं या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही.
भाजप
1) दादाराव केचे
2) संजय केणेकर
3) संदीप जोशी
शिवसेना
1) चंद्रकांत रघुवंशी
राष्ट्रवादी
1)संजय खोडके
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील आमदार विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानं त्या जागा रिक्त झाल्या होत्या. शिवसेनेचे आमशा पाडवी, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर आणि भाजपचे प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड हे विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानं त्यांचं परिषेदतील सदस्यत्व संपुष्टात आलं होतं. या रिक्त जागांसाठी विधानपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता.विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्या (18 मार्च) ला अर्जांची छाननी होईल. त्यानंतर 20 मार्चपर्यंत अर्ज मागं घेण्याची मुदत आहे. तर, मतदानाची तारीख 27 मार्च आहे. मात्र, पाचपेक्षा अधिक अर्ज आले नाहीत तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते.
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची सदस्यसंख्या 78 इतकी आहे. विधानसभेप्रमाणं परिषद दर 5 वर्षांनी भंग होत नाही. विधानपरिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. 78 सदस्यांपैकी 30 सदस्य विधानसभेच्या आमदारांकडून निवडले जातात. 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून मतदानाद्वारे निवडून दिले जातात. तर, शिक्षकांमधून 7 आमदार, पदवीधरांमधून 7 आमदार निवडले जातात. तर, राज्यपाल साहित्य, कला, सहकार आणि सामाजिक सेवा यातून 12 आमदारांची नियुक्ती करतात.विधानपरिषदेत पाच जागांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी 78 पैकी 52 सदस्य आहेत. यामध्ये 32 आमदार महायुतीचे आहेत. तर, महाविकास आघाडीकडे 17 आमदार आहेत. भाजपचे 19, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 6 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 7 आमदार आहेत. तर, महाविकास आघाडीच्या 17 मध्ये काँग्रेसचे 7, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 3 आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडे 7 आमदार आहेत.तर, तीन अपक्ष आमदार आहेत.