पुणे-बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणारा आकाचा आका हा एकच व्यक्ती आहे. हाच व्यक्ती संतोष देशमुख यांची हत्या होत असताना फोनवरून विकृतपणे या सगळ्याची मजा घेत होता, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पक्षाच्या रविवारी पार पडलेल्या बैठकीत बोलताना सुळे यांनी हा आरोप केला असल्याचा दावा केला जात आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणासह मंत्र्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणात सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला घेण्याचा प्रयत्न केला. यात त्यांनी धनंजय मुंडे यांच्याप्रमाणे लवकरच आणखी एकाची विकेट जाणार असल्याचा दावा देखील केला आहे. मात्र, त्या व्यक्तीचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे ती व्यक्ती कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे आवादा कंपनी विरोधात केंद्र सरकारला पत्र पाठवणारी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात व्हिडिओ पाहणारी ती व्यक्ती कोण? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
या संबंधात मला मिळालेल्या माहितीनुसार सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण होत असताना तिकडे एका व्यक्तीने फोन केला होता. ही व्यक्ती त्याची गंमत पाहत होती. हे किती विकृती आहे? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. ही व्यक्ती खंडणी, सत्ता आणि पैशाच्या जीवावर हे सगळे करत होती. इतकेच नाही तर आवादा कंपनीच्या विरोधात केंद्र सरकारला तीन पत्रे पाठवली होती, असा दावा त्यांनी केला आहे. यामध्ये आवादा कंपनी ही वाईट आहे, त्यांच्याकडे चांगले काम होत नाही. त्यांना बीड मधून बाहेर काढून टाका, असा उल्लेख या पत्रात केला होता. तर दुसरीकडे कंपनीवर आरोप करणारा तोच व्यक्ती दुसरीकडे त्यांना खंडणी मागायचा. असे प्रकार होत असल्याचा आरोप देखील सुळे यांनी केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांची नुकतीच विकेट गेली आहे. मात्र, मंत्रिमंडळातील आणखी एका नेत्याची विकेट जाणार असल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आणखी सहा महिने थांबा, आणखी एका व्यक्तीची विकेट जाणार आहे. हा व्यक्ती बायकोच्या आड सर्व उद्योग करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी समोर येऊन लढावे, असे आव्हान देखील सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. त्यामुळे आता तो मंत्री कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
धनंजय मुंडे यांच्या विरोधात ते आमच्यासोबत पक्षात असताना देखील लढाई सुरू होती, असा दावा सुळे यांनी केला आहे. मात्र बरे झाले पक्ष फुटला. बायकोच्या गाडीमध्ये बंदूक ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत मी काम करू शकले नसते, अशा शब्दात सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. जो व्यक्ती स्वतःची पत्नी, मुलांची आई असलेल्या महिलेच्या गाडीत बंदूक ठेवू शकतो, अशा पुरुषासोबत मी काम करू शकत नाही. मी याबाबत आज पहिल्यांदा बोलत असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. मी विरोधी पक्षात आयुष्य काढेल. मात्र नैतिकता तोडणार नाही. माझे घर कंत्राटदारांच्या पैशावर चालत नसल्याचे सुळे यांनी म्हटले आहे.