मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने १० किलो सोने जप्त केले आहे. त्याची बाजारभाव किंमत ८.४७ कोटी रुपये आहे. विमानतळाच्या तीन खासगी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.विमानतळ कर्मचाऱ्यांना हे सोने त्यांच्या अंतर्वस्त्रांमध्ये लपवून विमानतळाबाहेर न्यायचे होते. सीमाशुल्क विभागाने १३ ते १५ मार्च दरम्यान हे जप्त केले. सोमवारी याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली.
पहिल्या जप्तीमध्ये, विमानतळावरील एका खाजगी कर्मचाऱ्याच्या पँटच्या खिशात 6 कॅप्सूल आढळून आले. यामध्ये २४ कॅरेट सोन्याच्या पावडरचे वजन २.८ किलो भरले होते. त्याची बाजारभाव किंमत २.२७ कोटी रुपये एवढी आहे.दुसऱ्या एका जप्तीमध्ये, अधिकाऱ्यांनी दुसऱ्या एका वैयक्तिक कर्मचाऱ्याकडून २.३६ कोटी रुपये किमतीचे २.९ किलो २४ कॅरेट सोन्याचे पावडर जप्त केले. हे सोने सात कॅप्सूलमध्ये ठेवण्यात आले होते.
तिसऱ्या जप्तीमध्ये, आणखी एका कर्मचाऱ्याला पकडण्यात आले. त्याच्या अंतर्वस्त्रांमधून १.३१ कोटी रुपये किमतीचे १.६ किलो २४ कॅरेट सोन्याचे पावडर असलेले दोन पाउच जप्त करण्यात आले.
कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये ३.१ ग्रॅम सोन्याची पावडर आढळली
इतर दोन प्रकरणांमध्ये, विमानाच्या शौचालय आणि पेंट्रीमधून कचऱ्याच्या पिशव्यांची तपासणी करताना कस्टम अधिकाऱ्यांना दोन काळ्या पिशव्यांमध्ये ३.१ ग्रॅम सोन्याची पावडर सापडली. त्याची किंमत २.५३ कोटी रुपये आहे.