पुणे –
“दर्जेदार वैचारिक लेखन हे इतर साहित्य प्रकारांच्या तुलनेत रटाळ व रुक्ष असते, असा आपल्याकडचा प्रचलित समज आहे. मात्र, वैचारिक लेखनामध्ये नाट्यमयता नसेल, तर ते सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरत नाही. त्यामुळे वैचारिक वा संशोधनपर लेखन करणाऱ्यांनी आपल्या कसदार शैलीद्वारे दर्जेदार व तितक्याच वाचनीय वैचारिक लेखनाकडे वळायला हवे,” असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी रविवारी व्यक्त केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि समर्थ युवा फाउंडेशनतर्फे पुणे विद्यापीठात आयोजित ‘मी लेखक होणारच’ या कार्यशाळेमध्ये डॉ. मोरे बोलत होते. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, न्यासाचे संचालक राजेश पांडे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. कार्यशाळेमध्ये डॉ. मोरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ‘वैचारिक, संशोधन आणि सामाजिक लेखन’ या विषयावर मार्गदर्शन केले.
डॉ. मोरे म्हणाले, “वैचारिक लेखनामध्ये नाट्यमयता आणण्याची गरज लक्षात घेताना, लेखकांना आपला तोल जपता यायला हवा. आपल्या लेखनामधून आपण नेमके कोणत्या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत, याची स्पष्टता हवी. वैचारिक लेखनासाठी आपल्याला पडणारे प्रश्न हे व्यापक असावेत. त्यासाठी लेखक-संशोधकांनी आपले कुतूहल जागृत ठेवायला हवे.” उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना चांगले प्रश्न विचारणारे व्हा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या. पांडे यांनी डॉ. मोरे यांचे स्वागत केले. डॉ. अमित गोगावले यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
आयोजकांचे अभिनंदन…
डॉ. मोरे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना लेखनाकडे वळविण्यासाठी आयोजकांनी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. मोरे म्हणाले, “राजेश पांडे पुण्यामध्ये सध्या त्यांच्या संस्कृतीकारणाच्या माध्यमातून खूप मोठे योगदान देत आहेत. पुस्तक महोत्सवाद्वारे ते खूप महत्त्वाचे कार्य करत आहेत. डिजिटल माध्यमांच्या काळामध्ये नव्या पिढीला पुस्तकांकडे आणि लेखनाकडे वळविण्याचे हे काम महत्त्वाचे आहे.”
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी आयोजित इतर सत्रांमधून रविवारी विद्यार्थ्यांना प्रसाद मिरासदार, राजेंद्र खेर आणि योगेश सोमण यांनीही मार्गदर्शन करत आपले अनुभव सांगितले. मिरासदार यांनी ‘कथा बीज ते कथा रचना’ विषयावर बोलताना दर्जेदार कथानिर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करून सांगितली. त्यासाठी गरजेचे निरीक्षण, तपशील व बारकावे टिपण्याची सवय, कथांमधील पात्रे व त्यांच्या व्यक्तिरेखांची निर्मिती प्रक्रिया आदी बाबींची माहिती दिली. खेर यांनी कादंबरी लेखनाविषयी माहिती देताना आपले लेखन अधिकाधिक सखोल, तसेच वाचकांसाठी विश्वासपात्र ठरण्यासाठी महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकला. तर सोमण यांनी संहिता लेखन या विषयी मार्गदर्शन करताना कथेचा सार, कथानक, पात्रांचे नियोजन, शेवट आदी बाबी विचारात घेत गरजेची असणारी संवाद रचना आदी बाबींमधील तांत्रिकता सहजसोप्या मांडणीतून स्पष्ट करून सांगितली.
वाचनीय वैचारिक लेखनाकडे वळायला हवे-डॉ. सदानंद मोरे
Date: