पुणे- उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून शालेय सुट्ट्या सुरू असल्याने पुणे महापालिकेने सार्वजनिक उद्यानांची वेळ एक तास वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पूर्वी रात्री आठ वाजता बंद होणारी उद्याने आता रात्री नऊ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रमुख अशोक घोरपडे यांनी ही माहिती दिली.
पुणे महापालिकेने प्रत्येक उद्यानाची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र टीम नियुक्त केली आहे. यामध्ये खराब झालेल्या खेळण्यांची नोंद घेतली जात आहे. तसेच उद्यानांमध्ये सुरक्षेसाठी पुरेशी प्रकाशव्यवस्था आणि स्वच्छतेवरही भर दिला जात आहे. संध्याकाळच्या वाढीव वेळेत उद्याने अधिक प्रकाशमान राहावीत, यासाठी अतिरिक्त स्ट्रीटलाइट्स आणि दिवे बसवण्यात येत आहेत. स्वच्छता मोहिमा नियमितपणे राबवून उद्यानांचे सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जनतेच्या तक्रारी व निरीक्षण अहवालाच्या आधारे तत्काळ दुरुस्ती केली जात आहे, जेणेकरून मुलांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होणार नाही असे अशोक घोरपडे यांनी सांगितले.
पुणे शहरात महापालिकेची २२० हून अधिक सार्वजनिक उद्याने आहेत. ही उद्याने नागरिकांसाठी आवश्यक विश्रांती आणि आरोग्यवर्धक ठिकाणे आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.उन्हाळ्यात तापमान वाढल्याने बहुतांश नागरिक संध्याकाळी पाचनंतर उद्यानांकडे वळतात. पूर्वीच्या वेळेनुसार सकाळी सहा ते अकरा आणि संध्याकाळी चार ते आठ या वेळेत बागा उघड्या असत. मात्र नागरिकांना संध्याकाळचा अधिक वेळ मिळावा म्हणून आता रात्री नऊ वाजेपर्यंत उद्याने खुली ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.या निर्णयाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. रोजच्या कामाच्या व्यापातून बाहेर पडून थोडा वेळ उद्यानांमध्ये घालवण्याची संधी यामुळे उपलब्ध होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनाही संध्याकाळी अधिक वेळ फिरण्याचा पर्याय मिळणार असल्याने त्यांनी महापालिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
पुणे महापालिका पुढील काळात उद्यानांचे आणखी नूतनीकरण करण्याचा विचार करत आहे. वार्षिक देखभाल निधीतून उद्याने सुधारण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचा मानस महापालिकेचा आहे. बसण्याची अतिरिक्त सोय, पाण्याच्या सुविधा आणि लँडस्केपिंगसाठीही योजना आखण्यात येत आहे, असे महापालिकेच्या उद्यान विभागाकडून सांगण्यात आले.पुणे महापालिकेकडून उद्यानांची देखभाल करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. विशेषतः मुलांच्या खेळाच्या ठिकाणी अधिक लक्ष दिले जात आहे. कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ही ठिकाणे अधिक वापरली जातात.