नव्या भारताचे नवे कायदे, भारतीय न्याय संहिता 2023 मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
नागपूर, 16 मार्च 2025
नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळण्याकरिता भारत सरकारने लागू केलेल्या नवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांनी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश नितीन सांबरे यांनी आज येथे केले.
माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर तर्फे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपूर व श्री सती अनुसया माता देवस्थान, पारडसिंगा यांच्या सहकार्याने श्री सती अनुसया माता देवस्थान पारडसिंगा देवस्थान परिसर, ता. काटोल जि. नागपूर येथे आयोजित केलेल्या नव्या भारताचे नवे कायदे, भारतीय न्यायसंहिता 2023 या विषयावरील मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश अभय मंत्री, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा, आमदार चरणसिंग ठाकूर, जिल्हाधिकारी विपिन ईटणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सचिन पाटील, केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, उपविभागीय अधिकारी पियुष चिवंडे उपस्थित होते.
यावेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश नितीन सांबरे यांचा तसेच उपस्थित इतर मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन उमेश महतो यांनी केले.
ब्रिटिशकालीन कालबाह्य कायद्यांमध्ये सुधारणा करून भारत सरकारने १ जुलै २०२४ पासून नवीन कायदे अमलात आणले आहेत. या नवीन कायद्यांमध्ये नागरिकांना जलद व सुलभ न्याय मिळण्याकरिता तरतूद करण्यात आली आहे. तसेच नवीन तंत्रज्ञान विषयक नवीन कायद्यांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतची माहिती नागरिकांना करून देण्याकरिता माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर तर्फे काटोल तालुक्यातील पारडसिंगा देवस्थान येथे दोन दिवसीय मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात नवीन कायदे तसेच बदलण्यात आलेल्या जुन्या कायद्यातील सुधारित नवीन कायदे याबाबत सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. नागरिकांना मिळणाऱ्या कायदेविषयक सल्ला तसेच सुविधांविषयी माहिती देण्यात आली आहे. हे प्रदर्शन १७ मार्च २०२५ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत नागरिकांसाठी निःशुल्क खुले ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन कायदेविषयक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूर तर्फे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरचे तांत्रिक सहाय्यक संजय तिवारी, सहाय्यक मंगेश टिककस, एम.टी.एस. नरेश गच्छकायला परिश्रम घेत आहेत.