छावा चित्रपटातील संभाजी महाराजांच्या मृत्युपूर्व दृश्यांनी कबरीबाबतच्या भावना तीव्र
छत्रपती संभाजीनगर-मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील मुघल सम्राट औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होत आहे. त्यातच पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक ,कट्टर हिंदुत्ववादी आणि धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा दिल्याचे वृत्त पसरले. प्रशासनाने त्यांच्या इशाऱ्याची गंभीर दखल घेतली असून मिलिंद एकबोटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा बंदी करण्यात आली आहे. 16 मार्च 2025 ते 5 एप्रिल 2025 पर्यंत जिल्हा बंदीचे आदेश काढण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगरला जाण्याचं माझं कोणतही प्रयोजन नाही, असे असतानाही मला जिल्हाबंदीची नोटीस देण्यात आली आहे. ही नोटीस दिल्यामुळं माझी करमणूक झाली असल्याचे मिलिंद एकबोटे म्हणाले. माझं सर्व लक्ष छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यततिथीच्या कार्यक्रमाच्या नियोजनावर आहे. हा कार्यक्रम भव्य प्रमाणात व्हावा, यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे एकबोटे म्हणाले. मला दिलेली नोटीस संपूर्णपणे खोटी आहे. माझा उल्लेख माजी आमदार म्हणून करण्यात आला आहे. मी कोणताही माजी आमदार नाही. कदाचीत भावी आमदार असेन असे एकबोटे म्हणाले. काल्पनिक गोष्टी डोक्यात ठेऊन पोलिस अधिकाऱ्याने ही गोष्ट केलेली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारीत छावा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात मोगल बादशहा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे कशाप्रकारे हाल केले ते दाखवण्यात आले. या चित्रपटामुळे मराठा समाज व हिंदू धर्मातील लोकांच्या औरंगजेबाच्या कबरीबाबत भावना तीव्र झालेल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करणाऱ्याची कबर कशाला पाहिजे? असा सवाल करत ही कबर हटवण्याची मागणी होत आहे. त्याबाबत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर आक्रोश पाहावयास मिळत आहे. मिलिंद एकबोटे यांनी औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा दिल्याच्या माहिती नंतर त्यांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. याबाबत अपर जिल्हाधिकारी खिराळकर यांनी जिल्हा बंदीचे आदेश काढले आहेत.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांनी अहवालात नमूद केले आहे की, मिलिंद एकबोटे हे अत्यंत कडवट हिंदूत्ववादी कार्यकर्ते असून त्यांचेवर भिमा कोरेगाव दंगलीत सहभागी असल्याचा व इतर धर्मीयांच्या, समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याबाबतचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्यांनी प्रतापगडावरील अफजलखान कबर हटवण्यासाठी मोठे आंदोलन केले होते. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. तसेच त्यांचे संघटनेचे अनेक सदस्य व सक्रीय कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगर व आजूबाजूच्या जिल्ह्यात आहेत. गोपनिय माहितीनुसार जर सदर लोक तुळापूर वरून खुलताबाद येथे यायला निघाले तर हिंदूत्ववादी संघटनांचे अनेक सक्रीय सदस्य, कार्यकर्ते व कट्टर हिंदू लोक त्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना चालू आहे. तसेच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन देखील चालू असून सदर आंदोलनात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याचे हिंसक पडसाद संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उमटण्याची दाट शक्यता असल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163(1) अन्वये मिलिंद रमाकांत एकबोटे, माजी नगरसेवक तथा अध्यक्ष “धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठाण”, “हिंदू एकता मोर्चा”, “समस्त हिंदू आघाडी”, “शिवप्रताप भुमी मुक्ती आंदोलन” यांना व त्यांच्या समर्थकांना दिनांक १६ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्हा हद्दीमध्ये प्रवेश करण्याबाबत मनाई आदेश निर्गमित करण्याची विनंती अहवालातून करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी खिराळकर यांनी जिल्हा बंदी आदेश काढले आहेत.
मिलिंद एकबोटे यांच्यासह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून कबर नष्ट करण्याचा इशारा दिल्यानंतर औरंगजेबाच्या कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एसआरपीएफची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. या बंदोबस्तात दोन पोलिस अधिकारी आणि 15 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कबर परिसरातील दोन ठिकाणी नाकाबंदी आणि फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येक माणसाची तपासणी करूनच सोडले जात आहे.
औरंगजेब 1707 मध्ये वयाच्या 87 व्या वर्षी मरण पावला. त्याला औरंगाबाद आताचे छत्रपती संभाजीनगरपासून 25 किलोमीटर अंतरावर खुलताबाद येथे दफन करण्यात आले. संभाजीनगरमध्ये त्यांच्या पत्नीची कबर ‘बीबी का मकबरा’ आहे. औरंगजेबाने आपल्या मृत्युपत्रात खुलताबादमध्ये दफन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. जिथे त्यांचे गुरु, सुफी संत सय्यद जैनुद्दीन यांना दफन करण्यात आले होते. ही कबर सय्यद जैनुद्दीन यांच्या कबरीच्या संकुलातच आहे. त्याने त्याला एका साध्या उघड्या कबरीत पुरण्याचा आदेशही दिला होता. नंतर हैदराबादच्या निजामाने तत्कालीन भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांच्या विनंतीवरून थडग्याभोवती संगमरवरी ग्रील बसवली.

