मुंबई- औरंगजेब महाराष्ट्रात 27 वर्षे राहिला. त्यानंतरही त्याला येथे राज्य करता आले नाही. त्याचे प्रतीक म्हणून त्याच्या खुलताबाद येथील कबरीला हात न लावणे योग्य ठरेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी नुकतेच औरंगजेबाची कबर काढून टाकण्याचे विधान केले होते. त्यानंतर आज रोहित पवारांनी हे विधान केल्यामुळे या प्रकरणी शरद पवार गटात मतभेद असल्याचे अधोरेखित झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप आमदार तथा कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी ही कबर उखडून टाकण्याची भाषा केली आहे. त्यानंतर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने औरंगजेबाची कबर पाडा, अन्यथा बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करू असा इशारा दिला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील कबर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी उपरोक्त मत व्यक्त केले आहे.
रोहित पवार शनिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मोगल बादशहा औरंगजेब उत्तरेतून येऊन महाराष्ट्रात तब्बल 27 वर्षे राहिला. त्यानंतरही त्याला येथे राज्य करता आले नाही. त्याचे प्रतीक म्हणजे त्याची ही कबर आहे. ही कबर आज उखडून टाकली, तर भविष्यात लोक गडबड करतील. त्यामुळे एक प्रतीक म्हणून या कबरीला हात न लावणे योग्य ठरेल.
तत्पूर्वी, शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनीही औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असल्याचा दावा केला होता. औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य व गौरवाचे प्रतीक आहे. त्यांच्या शौर्यांचा इतिहास पुढच्या पिढीला कळाला पाहिजे. त्यामुळे ही कबर उखडून टाकू नये. सरकार राज्यातील मुख्य प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी असे काहीतरी समोर आणत आहे. ते सर्वसामान्यांच्या मुलभूत प्रश्नांवर बोलण्यास तयार नाही, असे म्हणाले होते.
उल्लेखनीय बाब म्हणजे शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी रोहित पवार व अभिजीत पाटील यांच्याहून वेगळी भूमिका मांडली आहे. त्यांनी औरंगजेब हा काही राष्ट्रपुरुष नव्हता असे म्हणत थेट औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची भाषा केली आहे. ते गत 11 मार्च रोजी पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की, औरंगजेब हा काही राष्ट्रपुरुष किंवा समाजसेवक नव्हता. त्याला तुम्ही सामाजिक रूप देऊ नका. त्याची कबर हटवण्यात गैर नाही. त्यामुळे त्याची कबर काढून टाकली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.नीलेश लंके यांच्या या भूमिकेमुळे आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात औरंगजेबाच्या कबरीवरून मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे, विश्व हिंदू परिषदेने आज अहिल्यानगर येथे पत्रकार परिषद घेऊन याविषयी 17 तारखेला सर्वच जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर औरंगजेबाची कबर काढून टाकली नाही तर लाखो हिंदू छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन कार सेवा करतील, असा इशारा बजरंग दलाचे महाराष्ट्र गोवा संयोजक विवेक कुलकर्णी यांनी दिला आहे. त्यामुळेखुलताबाद येथील औरंगजेब कबर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या ठिकाणी एसआरपीएफची 1 तुकडी, तसेच 2 अधिकारी आणि 15 कर्मचारी बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले आहेत. कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येक माणसाला चेक करून सोडले जात आहे .

