पुणे, दि.१५: बाजारामध्ये अनेक प्रकारे फसवणूक होऊ शकते ती टाळण्यासाठी ग्राहकांनी सदैव जागरूक ग्राहक असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अनिल जवळेकर यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने स्वारगेट मेट्रो स्थानक येथे जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. जवळेकर बोलत होते. यावेळी अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी अंकुश कांबळे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष विलास लेले, पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडे पाटील उपस्थित होते.
श्री. जवळेकर म्हणाले की, वस्तू किंवा सेवा खरेदी करताना ग्राहकाने जागरुक असणे आवश्यक आहे. आपल्या जागरुकतेमुळे दुसऱ्या एखाद्या नागरिकाची फसवणूक वाचू शकते. सर्वसामान्य जनतेला बाजारामध्ये ग्राहकांची कशी फसवणूक होऊ शकते याची माहिती या प्रदर्शनातून चांगल्या प्रकारे मिळेल. दुकानदारांनी आणि विभागांनी आपली जबाबदारी पार पाडताना ग्राहकाला दर्जेदार सेवा सुविधा उपलब्ध द्याव्यात जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या हक्कासाठी दाद मागावी लागू नये, असेही ते म्हणाले.
श्री. तुषार झेंडे पाटील म्हणाले, ग्राहक संरक्षण परिषदेची जबाबदारी ही ग्राहक संरक्षणाचे कायदे व ग्राहकांना त्यांच्या हक्कांची माहिती व जाणीव करुन देणे ही आहे. वस्तू किंवा सेवा खरेदी करताना लेखी बिल किंवा पावती घेणे. उत्पादन, उत्पादनाची तारीख, वापराची कालमर्यादा, किंमत, उत्पादन करणारी कंपनी आदी माहिती वस्तूवर छापणे बंधनकारक असून खरेदी करताना ग्राहकांनी ही बाब तपासून घेणे गरजेचे आहे. आता ऑनलाइन सेवा व खरेदीतही ग्राहकाची फसवणूक होऊ शकते. यासाठीही ऑनलाईन तक्रार दाखल करता येते, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक अन्नधान्य वितरण अधिकारी प्रशांत खताळ यांनी केले. यावेळी ॲड. समृद्धी ढवण, ॲड. अनिता गवळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरिक उपस्थित होते.
प्रदर्शनात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, पीएमपीएमएल, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र, अग्रणी बँक, राज्य आरोग्य प्रयोगशाळा, अन्नधान्य वितरण कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, वैधमापन शास्त्र, जिल्हा व सत्र न्यायालय, भारतीय मानक ब्युरो, अन्न व औषध प्रशासन कार्यालय, बीएसएनएल, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन यांच्यावतीने स्टॉल लावण्यात आले होते.