पुणे- लोणी काळभोर येथील तरुण महाबळेश्वर या ठिकाणी फिरण्यासाठी गेले असता फोर्ड एंडेवर कार १०० मीटर दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या झालेल्या अपघातात लोणी काळभोर येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात त्यांचे इतर दोन सहकारी गंभीररीत्या जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी (दि.१३) सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडला.
अक्षय म्हस्कू काळभोर (वय-२६), सौरभ जालिंदर काळभोर (वय-२६) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. तर वैभव काळभोर (वय-२४ ) बजरंग पर्वतराव काळभोर (वय-३५, सर्व रा- रायवाडी, लोणी काळभोर, ता- हवेली) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. दोन्ही जखमीं तरुणांना वाई येथील बेलर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अधिक माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरातील चार मित्र दोन दिवसांपूर्वी महाबळेश्वर याठिकाणी फिरण्यासाठी गेले होते. फिरून झाल्यानंतर गुरुवार (दि.१३) पाच वाजताच्या सुमारास महाबळेश्वर येथून लोणी काळभोरकडे घरी निघाले होते. दरम्यान, वाई – पाचगणी रस्त्यावरील पसरणी घाटात आले असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी थेट १०० मीटर दरीत कोसळली.
यावेळी वाई पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने चौघांना वाई येथील बेलर या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अक्षय आणि सौरभ काळभोर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर बजरंग पर्वतराव काळभोर आणि वैभव काळभोर हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बेलर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.