पुणे: अजराक सुपरजायंट्सने एसएसडी फाल्कन्सचा ४ गडी राखून पराभव करत सहाव्या सिंधी प्रीमिअर लीगचे विजेतेपद पटकविले. अष्टपैलू कामगिरी करणारा नरेंद्र लुंड सामनावीर ठरला. पिंपरीतील मृणाल क्रिकेट मैदानावर २४ दिवस ही स्पर्धा झाली. कसोटी क्रिकेटच्या धर्तीवर दोन डावांचा अंतिम सामना झाला. प्रत्येक डावात ९ षटके खेळण्यात आली.
नाणेफेक जिंकून एसएसडी फाल्कन्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ९ षटकात ७ गडी गमावत ४० धावा केल्या. अजराक सुपरजायंट्सने पहिल्या डावात अवघ्या ५ धावांची आघाडी घेत ८ बाद ४५ धावा केल्या. दुसऱ्या डावात एसएसडी फाल्कन्सने आक्रमक खेळ करत ५७ धावा उभारल्या. विजयासाठी ५३ धावांचे लक्ष घेऊन मैदानात आलेल्या सुपरजायंटचा सलामीवीर अष्टपैलू नरेंद्र लुंडने धडाकेबाज ३३ धावांची खेळी करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. राज गोविंदानीने दोन्ही डावांत २-२ बळी घेतले. ३३ धावांची खेळी आणि दोन्ही डावांत मिळून ४ बळी घेणाऱ्या नरेंद्र लुंड याला सामानावीराचा किताब मिळाला.

सिंधी तरुणांना खेळांसाठी प्रोत्साहित करण्याच्या, तसेच सिंधी संस्कृतीचे जतन आणि सामाजिक भावनेतून गेल्या सहा वर्षांपासून ‘सिंधी प्रीमिअर लीग’चे आयोजन केले जाते. यंदा लीगमधून उभारलेल्या निधीतून एएनपी केअर फाऊंडेशनला अँब्युलन्स देण्यात येणार असल्याचे संयोजक हितेश दादलानी व कन्वल खियानी यांनी सांगितले.
महिलांमध्ये गंगा वॉरियर्स विजयी
गंगा वॉरियर्सने सलग दुसऱ्या वर्षी सिंधी प्रीमिअर लीगचे विजेतेपद पटकावले. गंगा वॉरियर्स आणि यमुना स्ट्रायकर्स यांच्यात अंतिम सामना रंगला. गंगा वॉरियर्सने कर्णधार शीतल आसवानी (१६ चेंडूत २६ धावा) व ममता (१७ चेंडूत २० धावा) यांच्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर निर्धारित ८ षटकांत ३ बाद ६० धावा केल्या. विजयासाठी ६१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या यमुना वॉरियर्सची सुरुवात अडखळत झाली. शीतलने गोलदांजीतही कमाल करीत २ बळी घेतल्याने यमुना वॉरियर्सचा डाव ८ षटकांत अवघ्या ३५ धावांत संपुष्टात आला. शीतल आसवानीला सामनावीराचा किताब मिळाला.
संक्षिप्त धावफलक : (पुरुष गट)
पहिला डाव
एसएसडी फाल्कन्स: ९ षटकांत ७ बाद ४० (जतीन गोविंदानी १२, नरेंद्र लुंड ९-२)
अजराक सुपरजायंट्स : ९ षटकांत ८ बाद ४५ (कुणाल सिरवानी २२, राज गोविंदानी २०-२)
दुसरा डाव
एसएसडी फाल्कन्स : ९ षटकांत ७ बाद ५७ (राहील दायलानी २८, रोहित मुलचंदानी १४, नरेंद्र लुंड ८-२, जतीन सेवानी १४-२, जय मायारमनी १४-२)
अजराक सुपरजायंट्स : ९ षटकांत ५ बाद ५३ (नरेंद्र लुंड ३३, राज गोविंदानी १०-२, जयेश मायारामानी १०-२)
निकाल: अजराक सुपरजायंट्स ४ विकेट्स राखून विजयी
संक्षिप्त धावफलक : (महिला गट)
गंगा वॉरियर्स – ८ षटकांत ३ बाद ६० (शीतल आसवानी २६, ममता २०) विजयी यमुना स्ट्राइकर्स : ८ षटकांत ६ बाद ३५ (स्वीटी ७, पर्ल ७, शीतल आसवानी ४-२)