इतिहास अभ्यासक रायबा नलावडे ; प्रभात मित्र मंडळातर्फे ‘शिवसूर्य’ स्मरणिका प्रकाशन
पुणे : प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या विचारांचा संगम जर कलियुगात पाहायचा असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये पाहायला मिळतो. शिवरायांच्या चरित्रातून आपल्याला प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे या भूमीचे दोन डीएनए आहेत. त्यांनी ज्ञान, शक्ती आणि भक्तीच्या त्रिवेणी संगमातून स्वराज्यनिर्मिती केली असल्याचे मत इतिहास अभ्यासक रायबा नलावडे यांनी व्यक्त केले.
गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळाच्या ‘शिवसूर्य; स्मरणिका प्रकाशन कार्यक्रम श्री नाकोडा भैरव जैन धर्मशाळा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, जनता सहकारी बँक,पुणेचे संचालक नाना कांबळे, ऍड. प्रताप परदेशी, मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उत्सव प्रमुख नितीन घोगरे, अमोल व्यवहारे, रवींद्र भन्साळी, मंगेश शिंदे, ओमकार नाईक, हेमराज साळुंके, अमोल थोरात, अथर्व बोगम, कृष्णा परदेशी आदी उपस्थित होते.
स्मरणिका प्रकाशन सोहळ्याचे हे ९ वे वर्ष होते. कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे हवेली तालुका कला क्रीडा सामाजिक संस्था, पुणे यांचे पदाधिकारी पै.भरत चौधरी व पै.भीमराव वांजळे यांचा मान्यवरांचे हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
अण्णा थोरात म्हणाले, शिवजयंती सोहळा हा प्रत्येकामध्ये उत्साह निर्माण करीत असतो. आपल्याकडे तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे अशी दोन वेळा शिवजयंती साजरी होते. तारखेच्या वेळी जेवढा उत्साह असतो, तेवढाच तिथीप्रमाणे सोहळा साजरा करताना दिसतो. ही अत्यंत चांगली बाब आहे.
किशोर चव्हाण म्हणाले, शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांसोबतच विचारांचे प्रबोधन व्हावे, यासाठी स्मरणिका प्रकाशन केले जाते. स्मरणिकेकरिता मंडळाचे कार्यकर्तेच लेखापासून ते इतर नियोजनांपर्यंत सर्व काम करतात. शहराच्या पूर्व भागातील शिवजयंतीचा भव्य दिव्य सोहळा प्रभात मित्र मंडळ साजरा करीत असून त्याची सुरुवात प्रकाशन सोहळ्याने होते, असेही त्यांनी सांगितले. निलेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.