डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समिती भेटली केंद्रीय राज्य मंत्र्यांना
पुणे: मंगळवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या भावी विकास व योजनेसाठी आरक्षित जागा खासगी बिल्डरला देण्याचा निर्णय दुर्दैवी आहे. हा करार रद्द करून सदरची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारासाठी त्वरित द्यावी, अशी मागणी दलित, बहुजन व आंबेडकर अनुयायांची आहे. सामाजिक हिताच्या दृष्टीकोनातून या संवेदनशील व महत्वपूर्ण जागेचा प्रश्न मार्गी लावून डॉ. आंबेडकर भवनाचे विस्तारीकरण करण्यात पुढाकार घ्यावा, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समितीने केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली.
सदरच्या जागेत आंबेडरकर भवनाचा विस्तार व्हावा, डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक व्हावे, यासाठी पुण्याचे खासदार या नात्याने राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा, या मागणीचे निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समितीच्या वतीने मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आले. प्रसंगी माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड, ॲड. अविनाश साळवे, डॉ. सिद्धार्थ धेंडे, रोहिदास गायकवाड, परशुराम वाडेकर, संजय सोनावणे, शैलेश चव्हाण, राहुल डंबाळे, शाम गायकवाड, महिपाल वाघमारे युवराज बनसोडे यांच्यासह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनालगत मंगळवार पेठेतील सर्व्हे नंबर ४०५ मधील जागा विस्तारीकरणासाठी देण्याचा निर्णय २० जुलै २००० मध्ये पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत झाला होता. मात्र, ४ सप्टेंबर २०२४ पासून एन. जी. व्हेंचर्सला ६० वर्षांच्या भाडेकरारावर देण्याचा करार केला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एखादा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्यास त्याची तात्काळ अंमलबजावणी होण्याऐवजी नियम धाब्यावर बसवून कायद्याची पायमल्ली करत घाईगडबडीने हा भूखंड खाजगी कंपनीला देण्याचा निर्णय घेतला. पक्ष व राजकारण बाजूला ठेवून आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचा विषय असलेली ही जागा खासगी बिल्डरच्या घशात देऊ नये.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासाठी आंबेडकरी जनतेच्या भावना तीव्र आहेत. या भवनाचे विस्तारीकरण करण्याचे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे महापालिकेने २००० मध्ये केलेल्या ठरावाची त्वरित अंमलबजावणी करून येथे आंबेडकर भवनाचा विस्तार व स्मारकाचे काम त्वरित सुरु करावे. महापालिकेच्या वतीने आंबेडकरी विचारांचे प्रचार व प्रसार केंद्र, संशोधन केंद्र, स्पर्धा परीक्षा केंद्र, अभ्यासिका यासह डॉ. आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारावे, जेणेकरून आंबेडकरी समाजाला न्याय मिळेल, असे या निवेदनात म्हटले आहे.