पुणे, दि. १२ मार्च २०२५: विजेची मागणी वाढल्यामुळे महाराष्ट्र व गुजरात राज्यातील ४०० केव्ही पारेषण वीजवाहिन्यांचे व्होल्टेज बुधवारी (दि. १२) दुपारी २.४७ वाजता कमी (अंडर व्होल्टेज) झाले. त्यामुळे इतर ४०० केव्ही ग्रीडचा वीजपुरवठा बंद पडण्याचा धोका टाळण्यासाठी एलटीएस (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाली. यात २५६ मेगावॅटची तूट निर्माण झाल्यामुळे प्रामुख्याने मंचर, राजगुरुनगर, मुळशी तसेच रास्तापेठ विभागातील सुमारे २ लाख १२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा २५ ते ३० मिनिटांपर्यंत बंद ठेवावा लागला.
४०० केव्ही वीजवाहिन्यांचे व्होल्टेज ३७५ ते ३६५ केव्हीपर्यंत आल्याने विजेची आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अंडर व्होल्टेजमुळे भार व्यवस्थापनासाठी एलटीएस (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाली. यात महापारेषण कंपनीच्या काठापूर, थेऊर, फुरसुंगी, मरकळ, सणसवाडी, पिंपळगाव व कुरुळी या २२० केव्ही उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला.
मात्र महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपन्यांनी युद्धपातळीवर केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे पुणे परिमंडलामध्ये अर्धा तासात विजेची आपत्कालिन परिस्थिती नियंत्रणात आली. यासाठी महानिर्मितीने कोयना जलविद्युत प्रकल्पाद्वारे विजेची जादा निर्मिती केली. तर महावितरण व महापारेषणने संयुक्तपणे विजेचे भारव्यवस्थापन केले.
पारेषणमधील २५६ मेगावॅट विजेची तूट भरून काढण्यासाठी नाईलाजाने वीजपुरवठा २५ ते ३० मिनिटांपर्यंत बंद ठेवण्यात आला. यात मंचर विभागातील मंचर शहर, पिंपरखेड, निरगुडसर, काठापूर, लोणी, पेठ, राजगुरुनगर विभाग अंतर्गत आळंदी शहर, गोळेगाव, पिंपळगाव, मरकळ, धानोरे, सोलू, केळगाव, शेलपिंपळगाव, कळूस, भोसेबहूल, वडगाव आणि मुळशी विभाग अंतर्गत वाघोली, केसनंद, आव्हाळवाडी, पेरणे, थेऊर, वडती, कुंजीरवाडी, लोणी काळभोर, सोरतापवाडी, फुरसुंगी, उरुळी देवाची तसेच रास्तापेठ विभागातील कोंढवा व एनआयबीएम परिसर येथील सुमारे २ लाख १२ हजार ग्राहकांचा समावेश होता.