मुंबई: महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार यांनी महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या लोहगाव सह इतर गावांच्या विकास आराखड्याबाबतीत शासनाचे लक्ष वेधले. पठारे म्हणाले, “समाविष्ट झालेल्या गावांचा विकास आराखडा अद्याप शासनाकडून मंजूर न झाल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या गावांमध्ये डीपी (विकास आराखडा) प्लॅन नसल्यामुळे नागरिकांच्या जमिनी, भूखंड आणि बांधकाम संदर्भातील कायदेशीर प्रक्रिया रखडल्या आहेत. परिणामी, अनेक कुटुंबांना मालमत्तेच्या संदर्भातील तांत्रिक आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “वडगावशेरी मतदारसंघातील प्रमुख रस्ते, जोडरस्ते आणि पदपथांवर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले असून, याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे.” महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील संबंधितांकडून हप्ते वसूली होत असल्याचे आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार पठारे यांच्या ठोस मागणीनंतर उद्योग मंत्री मा. श्री. उदयजी सामंत यांनी या सर्व बाबींची सखोल शहानिशा करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट आश्वासन दिले. यामुळे वडगावशेरी मतदारसंघातील नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. शासनाच्या त्वरित हस्तक्षेपामुळे या भागातील नागरी समस्यांचे निराकरण होईल, अशी अपेक्षा आहे.